19 April 2019

News Flash

मॅथियस एनार्ड

अलीकडे पाश्चिमात्य देश व पूर्वेकडील देश यांच्यातील जे वाद आहेत ते नाकारता येणार नाहीत.

मॅथियस एनार्ड यांना फ्रान्सचा गोनकोर्ट हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.

समाजातील घटनांचे प्रतििबब हे साहित्यात उमटत असते. अलीकडे पाश्चिमात्य देश व पूर्वेकडील देश यांच्यातील जे वाद आहेत ते नाकारता येणार नाहीत. या परिस्थितीतही पूर्व आणि पश्चिम यांच्यातील सांस्कृतिक आदानप्रदानाचे साहित्यकृतीतून गुणगान करणारे मॅथियस एनार्ड यांना फ्रान्सचा गोनकोर्ट हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मॅथियस यांच्या ‘बोसोल’ (कंपास) या काव्यात्म कादंबरीला हा पुरस्कार देऊन गौरवताना एका सांस्कृतिक वारशावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांचा जन्म फ्रान्समध्ये ११ जानेवारी १९७२ रोजी झाला. आता ते अरबी भाषेचे प्राध्यापक आहेत. मॅथियस यांना अरबी व पíशयन या दोन्ही भाषा येत असल्याने त्यांनी मध्यपूर्वेतील अनुभवांचे अस्सल चित्रण त्यांच्या कादंबरीतून केले आहे. ‘बोसोल’ या कादंबरीच्या कथेत एक झोपेचा त्रास असलेला संगीततज्ज्ञ फ्रँटझ रिटर हा त्याच्या आजारपणात व्हिएन्ना येथे बिछान्यावर असताना सतत विचार करत पडलेला असतो. एका फ्रेंच महिलेबाबतच्या तरल भावना व युरोप-मध्यपूर्व यांच्यातील नाते असा दुहेरी धागा त्यांनी या कथेत विणला आहे. फ्रेंच भाषेतील अतिशय कल्पक साहित्यकृतीला हा पुरस्कार दिला जातो. मॅथियस एनार्ड हे असे लेखक आहेत ज्यांनी पूर्वी ‘झोन’ नावाची एक कादंबरी लिहिली आहे ज्यात पाचशे पानांमध्ये दीड लाख शब्दांचे एकच वाक्य आहे. ते युरोपीय क्रूरतेवरचे स्वगत आहे. एकूण नऊ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. फ्रेंच साहित्यात प्रायोगिक व नवीन कल्पना ज्यांनी वापरल्या त्या साहित्यिकात एनार्ड एक आहेत. या पुरस्काराची रक्कम फक्त दहा युरो असली तरी तो फ्रान्समधला सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे; पण या पुरस्काराने त्या लेखकाच्या पुस्तकाला प्रचंड खपाची हमी मिळते असा आजवरचा इतिहास आहे. आता पुरस्कार प्राप्त झालेली ‘बोसोल’ कादंबरी अजून अमेरिकेत प्रकाशित झालेली नाही, पण ‘झोन’ व ‘स्ट्रीट ऑफ थीव्हज’ या त्यांच्या दोन कादंबऱ्या ओपन लेटर बुक्स प्रकाशनाने भाषांतरित स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या ‘टेल देम अबाऊट बॅटलस’, ‘किंग्स अँड एलिफंट्स’या लघुकथेला लायीन गोनकोर्ट हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारात माध्यमिक शाळेचे विद्यार्थी परीक्षक असतात. २००३ मध्ये त्यांच्या ‘ला परफेक्शन द तीर’ या पहिल्या कादंबरीलाही फ्रेंच भाषेतील पुरस्कार मिळाला होता, त्यात त्यांनी त्या काळात एका अज्ञात देशातील यादवीचे चित्र रंगवले आहे; पण तो देश लिबिया आहे असे सांगितले जाते यात त्यांचे द्रष्टेपण ध्यानात येते.

First Published on November 7, 2015 12:55 am

Web Title: mathias enard wins prix goncourt 2015