21 February 2019

News Flash

माया विश्वकर्मा

अमेरिकेतून आलेली माया पॅडवुमन म्हणून मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्य़ात काम करीत आहे.

माया विश्वकर्मा

मध्य प्रदेशातील एका गावात जन्मलेली माया विश्वकर्मा ही लोहारकाम करणाऱ्या गरीब बापाची कन्या. सुरुवातीला पाळी आली तेव्हा तिला दुसऱ्याच एका महिलेने वापरलेला कपडा देण्यात आला, त्यामुळे तिला संसर्ग झाला. वयाच्या सव्विसाव्या वर्षांपर्यंत तिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरण्याची वेळ आली नाही, तिला त्याबाबत माहितीही नव्हते, त्यासाठी पैसाही नव्हता. पुढे पदव्युत्तर पदवी घेऊन नंतर तिने दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात संशोधन सुरू केले. त्या वेळीही मासिक पाळीतील आरोग्याची असुरक्षितता तिला जाणवली होती. नंतर ती अमेरिकेला गेली, तेथे कर्करोग जीवशास्त्रज्ञ बनली, पण सामान्य आयाबहिणींच्या जीवनात भेडसावणारा हा छोटासा प्रश्न कर्करोगावरील संशोधनात गढून जातानाही ती विसरली नव्हती.  अमेरिकेतून आलेली माया पॅडवुमन म्हणून मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्य़ात काम करीत आहे.

महिलांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या सॅनिटरी पॅडवर जीएसटी कमी करण्यास केंद्र सरकार तयार नाही. त्यासाठी आता सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांनी  महिलांना स्वस्तात, वेळप्रसंगी फुकटात उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याच्या या कार्यात उडी घेतली असून त्यात माया विश्वकर्मा एक आहेत. माया यांनी अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात रक्ताच्या कर्करोगावर संशोधन सुरूच ठेवले आहे. गेली दोन वर्षे त्या सात-आठ महिने भारतात येऊन हे सॅनिटरी नॅपकिन व जनआरोग्य प्रसाराचे काम करतात. दोन हजार आदिवासी महिला व मुलींपर्यंत त्या पोहोचल्या आहेत. अभियांत्रिकीतील तरुण पदवीधर असलेल्या ग्वाल्हेरच्या अनुराग व बिराग बोहरे या दोन तरुणांनी त्यांना सॅनिटरी पॅड मशीन तयार करण्यात मदत केली. त्यातून त्यांचा प्रकल्पही उभा राहिला. क्राऊड फंडिंगमधून पैसा उभा करून व प्रसंगी पदरमोड, परदेशातील मित्रांची मदत घेऊन माया यांनी सुकर्मा फाऊंडेशन सुरू केले. पॅडमॅन मुरुगनथम यांनी तयार केलेले यंत्रही त्यांनी पाहिले. सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करून ते फुकट वाटण्यासाठी त्या दात्याच्या शोधात आहेत. नरसिंगपूरच्या आदिवासी भागातील आयाबहिणींमध्ये अमेरिकेतून उच्चशिक्षित होऊन आलेली माया पॅडजीजी म्हणून ओळखली जाते. त्यांनी तयार केलेले सॅनिटरी पॅड्स हे १५ ते २० रुपयांना सात मिळतात. अमेरिकेतील संशोधनाचे काम करतानाच आपल्या मायभूमीतील आयाबहिणींवर मायेची पाखर घालणारी माया खरोखरच मोलाचे काम करीत आहे.

First Published on February 5, 2018 2:35 am

Web Title: maya vishwakarma personal profile