जाहिरात ही एक कला आहे. तिच्या माध्यमातून निर्मात्यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविता येतात. मात्र एखादा सिनेमा हिट होईल अथवा डब्यात जाईल, याप्रमाणे तिच्या सादरीकरणावरही उत्पादनाचे, त्या कंपनीचे यशापयश अवलंबून असते. ‘महाशयां’नी मात्र या चौसष्टांपैकी एका कलेचा चांगला उपयोग करून घेतला. मग तो टांगाचालक म्हणून ‘करोल बाग, दो आना’ असे दिल्ली रेल्वे स्टेशनवर हाळी देण्याचा कृष्णधवल कालावधी असो की ‘दादाजी’ नात्याने नवपरिणीत युवा दाम्पत्याला दूरदृश्यसंवादाद्वारे आशीर्वाद देणारा ‘ईस्टमनकलर’चा सद्य कालावधी असो. यशाची ही मेख धर्मपाल गुलाटी यांनी नेमकी ओळखली होती.

कार्टूनिस्ट प्राणच्या ‘चाचा चौधरी’सारखा फे टा आणि मिशी, चेहऱ्यावर नियमित हास्य, नजरेत करडा आत्मविश्वास, ‘साठ सालके जवान’ला (झंडू केसरी जीवनची जाहिरात आठवते का?) लाजविणारे व्यक्तिमत्त्व गुरुवारी काळाच्या पडद्याआड गेले. वयाने शतकाच्या उंबरठय़ावरील महाशय, दादाजी अर्थात ‘मसाला किं ग’ म्हणजेच धर्मपाल गुलाटी यांचे करोनाची बाधा झाल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने दिल्ली रुग्णालयात निधन झाले.

टाळेबंदीत प्रत्येकजण निराशावस्थेत असताना समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या टांगा ते रोल्स रॉईस अशी अनुक्रमे कृष्णधवल व रंगीत छायाचित्रातील (केशारोपण जाहिरातीतील बिफोर-आफ्टरप्रमाणे) व्यक्ती मात्र उभारी द्यायची. धर्मपाल यांचा प्रवासच तसा होता म्हणा.

वडिल चन्नीलाल गुलाटी यांनी तेव्हाच्या अखंड पंजाबातील सिआलकोट शहरात (आता पाकिस्तानात) सुरू के लेल्या किराणा दुकानात मन रमले नाही म्हणून सुतारकाम, प्रसंगी साबणाच्या कारखान्यात कामगार म्हणून भूमिका वठविली. दिल्लीत आल्यानंतर धर्मपाल यांनी जवळ असलेल्या १,५०० रुपयांपैकी ६५० रुपयांमध्ये टांगा खरेदी करून तो ‘करोल बाग, दो आना’ असा प्रचार करत उदरनिर्वाह के ला. स्वत:बरोबर मोठय़ा कु टुंबाचा भार असा काही आण्यांमध्ये पेलणारा नाही हे ओळखून त्यांनी पूर्वाश्रमीचा व्यवसाय अंगिकारला. यात यश असल्याचे हेरून त्यांनी त्याला नेटके रूप दिले. आकर्षक वेष्टनासह, यंत्रांच्या साह्याने उत्पादनांची निर्मिती सुरू केली. वडिलांनी ठेवलेल्या ‘एमडीएच’ नावाला कं पनीचा आकार दिला. ‘महाशिआन दी हट्टी, सिआलकोट देग्गी मिर्चवाले’ अशी जाहिरात वर्तमानपत्रातून दिली. आणि त्याच जोरावर चार दशकांत खिशातील १,५०० रुपये ते १,५०० कोटी रुपयांचा व्यवसाय असा प्रवास नोंदवला.

पाचवीचे शिक्षण अर्धवट सोडून शाळेला रामराम करणारे धर्मपाल ‘एमडीएच’च्या जोरावर २० हून अधिक शैक्षणिक, आरोग्य संस्थांचे संस्थापक बनले. वर्षांला २१ कोटी वेतन घेणारे सर्वोच्च ‘सीईओ’ अर्थात मुख्याधिकारी म्हणून त्यांच्या नावाची नोंदही झाली. देशाचा तिसरा अव्वल नागरी पुरस्कार – पद्मभूषणने ते सन्मानित होते. ‘रूपा पब्लिकेशन्स’च्या मल्लिका अहलुवालिया यांच्या ‘डिव्हायडेड बाय पार्टिशन, युनायटेड बाय रेझीलियन्स’ या त्यांच्यावरील पुस्तकाच्या मथळ्याप्रमाणेच आज ‘एमडीएच’ उद्योग समूह टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीच्या भाऊगर्दीत भक्कम उभा आहे. त्याचा पाया अर्थातच दादाजी, ‘महाशय’ यांनी घालून दिलेला आहे!