17 October 2019

News Flash

मीना तुपे

७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या शंभर वर्षांहून अधिकच्या काळात सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब प्रथमच एखाद्या महिलेने प्राप्त करण्याचा इतिहास रचणाऱ्या उपनिरीक्षक मीना तुपेच्या कामगिरीने बीड जिल्ह्य़ातील दगडी शहाजानपुरा या छोटय़ाशा गावाचे नाव प्रकाशझोतात आले आहे. मीनाच्या कामगिरीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव सोहळा अनुभवताना तिला शिक्षणाला प्रोत्साहन देणारे वडील भिवसेन तुपे आणि कधीकाळी मुलींनी शिकण्याची गरज नाही, अशी अपेक्षा बाळगणारी आई शशिकला या दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
७४९ प्रशिक्षणार्थीच्या तुकडीत सवरेत्कृष्ट ठरणे सोपी गोष्ट नाही. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रबोधिनीत १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. लहानपणापासून शेतात नांगरणी, खुरपणी अशी अंगमेहनतीची सर्व कामे करणाऱ्या मीनाला हे प्रशिक्षण त्यामुळे खडतर भासलेच नाही. तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बेताचीच. चार एकर कोरडवाडू शेतीवर गुजराण करणाऱ्या या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा. बहिणींमध्ये मीना सर्वात लहान. मुलींनी शिक्षणच घेऊ नये असा आईचा आग्रह असल्याने मोठय़ा तिन्ही बहिणींचे जेमतेम शालेय शिक्षण झाले. परंतु, मीनाचा शिक्षणाचा हट्ट कायम राहिला. शिक्षिका होण्याचे तिचे ध्येय होते. त्यासाठी शिक्षणशास्त्र पदविकाही तिने प्राप्त केली. मात्र, शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीची आशा धूसर वाटत होती. याच काळात पोलीस भरतीची जाहिरात पाहून तिचा निर्णय बदलला. ती हवालदार झाली. खंडाळा प्रशिक्षण केंद्रातही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून तिने प्रथम पारितोषिक मिळवले. पण या पदावर तिचे मन रमेना. पोलीस अधिकाऱ्यांच्या कामामुळे मीनाला प्रेरणा मिळाली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत ती महिलांमध्ये थेट राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतही तिने सरस कामगिरीद्वारे सवरेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्राप्त केला.
शेतकरी कुटुंबातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवे. त्यासाठी मार्गदर्शन करण्याची तिची तयारी आहे. मीनाची हुशारी केवळ शारीरिक प्रशिक्षणाच्या बाबतच दिसून येते असे नव्हे. शेतकरी आत्महत्येवरील तिचे विचार सर्वानाच अंतर्मुख करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ वरवरची चर्चा करून उपयोग नाही. त्यासाठी काहीतरी खोलवर उपायांची गरज आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांचे अपार कष्ट लक्षात घेऊन मुलांनी चांगला अभ्यास केल्यास आत्महत्येसारखा प्रश्नच उद्भवणार नाही, असे तिचे म्हणणे आहे. शेतकरी कुटुंबांना यामुळे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सध्याच्या काळात सत्ता व पैसा याला सर्वाधिक महत्व आहे. त्यामुळे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असा समज आहे. परंतु, कठोर मेहनतीने हा दृष्टिकोन बदलता येतो आणि त्याची ताकत शेतकरी कुटुंबातही आहे. मीना तुपेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

First Published on June 10, 2016 2:57 am

Web Title: meena tupe