यशस्वी पत्रकार व ललितलेखक असे समीकरण क्वचितच बघायला मिळते, ते मेघना पंत यांच्यात आहे. ‘ पीपल ऑफ द सन’ या कथेसाठी त्यांना नुकताच ‘फेलोज ऑफ नेचर (फॉन) साऊथ एशिया शॉर्ट स्टोरी अ‍ॅवॉर्ड’ हा निसर्गलेखनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिमल्यात जन्मलेल्या मेघना यांच्या लिखाणात निसर्गाची प्रेरणा आधीपासून होती. शिक्षण मात्र दिल्लीत झाले, तर पुढे झुरिक, सिंगापूर, दुबई व न्यूयॉर्क शहरात अनुभवांची शिदोरी घेतली. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र व सांख्यिकीत पदवी घेऊन, सिंगापूरच्या नानयांग बिझीनेस स्कूल या संस्थेतून एमबीए केले. स्वित्र्झलडमधील सेंट गॅलेन विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांची ओळख आर्थिक पत्रकार व ललित-लेखक अशी आहे. त्यांनी अनेक इंग्रजी वृत्त-वाहिन्यांवर काम केले. न्यूयॉर्क शेअर बाजाराचे वार्ताकन, अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा, उद्योजक मुकेश अंबानी, सर रीचर्ड ब्रॅनसन, रतन टाटा, शाहरूख खान अशा अनेक नामांकितांच्या मुलाखती.. हे करणाऱ्या मेघना यांची साहित्यिक म्हणून ओळख ‘वन अँड अ हाफ वाइफ’ (२०१२ , वेस्टलँड बुक्स) वा ‘हॅपी बर्थडे’ (२०१३,  रँडम हाउस) या पुस्तकांतून घडते आहे.  सध्या मेघना मुंबईत असतात. त्यांनी पहिली कादंबरी लिहिली, त्यानंतर पाच वर्षे होऊनही ती आंतरराष्ट्रीय प्रकाशकांकडून प्रसिद्ध झाली नाही. मग त्यांनी ते पुस्तक भारतीय प्रकाशकांकडे पाठवले. दोन तासांत त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांनी पहिले कथावाचन मुंबईत केले, तेव्हा सार्वजनिक मंचावर त्या प्रथमच  आल्या. वाचकांच्या प्रतिसादाने भारावून गेल्या.

अवतार रिव्ह्य़ू, वसाफिरी, एक्लेक्टिका व क्यूएलआर या ललितसाहित्यास वाहिलेल्या नियतकालिकांत त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना म्यूज इंडिया यंग रायटर अ‍ॅवॉर्ड, सिनॅमॉन प्रेस नॉव्हेल रायटिंग अ‍ॅवॉर्ड, अ‍ॅमेझॉन ब्रेकथ्रू नॉव्हेल अ‍ॅवॉर्ड असे पुरस्कार याआधी मिळाले आहेत. त्यांच्या हॅपी बर्थडे पुस्तकास फ्रँक ओकॉनर इंटरनॅशनल शॉर्ट स्टोरी अ‍ॅवॉर्ड मिळाले होते. व्यंग्यअभिनेता (कॉमेडियन) सौरभ पंत यांच्या त्या बहीण आहेत.

‘वन अँड अ हाफ वाइफ’ या पुस्तकात त्यांनी भारतातून अमेरिकी स्वप्नाच्या मागे लागत अमेरिकेला गेलेल्या कुटुंबाची कथा साकारली आहे. त्यांनी न्यूयॉर्कमधील तीन वर्षांच्या वास्तव्यातील अनुभवाचा वापर त्यात केला आहे. त्या जेव्हा परत मुंबईला आल्या तेव्हा त्यांना अनेक गोष्टी बदललेल्या दिसल्या. विवाह व स्थलांतर या कथावास्तूचा आधार घेत त्यांनी अमेरिकन ड्रीमच्या पाठलागाचे अपयश व इंडियन ड्रीमचा उदय रेखाटला आहे. भारतीय समाजात अजूनही पारंपरिकतेला महत्त्व आहे असे त्या सांगतात ; पण त्याबद्दलचे मतप्रदर्शन न करता ललितसाहित्यच लिहितात!