15 November 2018

News Flash

मेह्ली गोभई

मेह्ली  गोभई यांच्या नावाचा मुंबईत रूढ झालेला उच्चार ‘मेल्ही’ असाच होता.

मेह्ली  गोभई यांच्या नावाचा मुंबईत रूढ झालेला उच्चार ‘मेल्ही’ असाच होता. त्यांच्या उंच, गौरवर्णी आणि देखण्या व्यक्तिमत्त्वाचा वावर अतिशय सहज असे; त्यामुळे त्यांचे समवयस्क चित्रकार, समीक्षक यांच्यापासून अगदी नवख्यांपर्यंत सर्व जण त्यांना ‘मेल्ही’ अशीच हाक मारत. ते कुणाचेही ‘गोभईसर’ वगैरे कधीच नव्हते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे काय आहे, हे कळण्यासदेखील त्यांच्या मनमिळाऊ- तरीही- संयमी स्वभावामुळेच काही वेळ जावा लागत असे! कुलाब्याला एका दोनमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर एकटेच ते राहात, तिथेच ६०० चौरस फुटांचा त्यांचा स्टुडिओ होता. थोडय़ाफार ओळखीवर आणि वेळ ठरवण्याचे सोपस्कार पाळल्यास कुणाचेही तिथे स्वागत होई. अशा ‘मेल्ही’ गोभईंची निधनवार्ता गुरुवारी आली. गेल्या दोन वर्षांत कंपवात आणि अन्य व्याधींनी त्यांना घेरले होते. रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.

डहाणूच्या पारशी कुटुंबात १९३१ साली जन्मलेले  मेल्ही मुंबईत वाढले. सेंट झेवियर्स स्कूल व सेंट झेवियर्स कॉलेजात शिकले. कलाशिक्षण घेतले नसताना, ‘हात चांगला’ म्हणून ते के. एच. आरांच्या घरी- ‘आर्टिस्ट सेंटर’मध्ये जात, अन्य चित्रकारांना भेटत. हा चित्रकारांचा मेळा कधी ‘न्यूड मॉडेल’ चितारण्याचा बेत करी.. ते दिवस मागे ठेवून मेल्ही लंडनला कलाशिक्षणासाठी गेले, तिथून अमेरिकेस गेले. तो १९६० चा काळ अमेरिकी अमूर्त अभिव्यक्तिवाद (अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम) या चळवळीचा. मार्क रॉथ्कोच्या चित्रांनी मेल्ही  प्रभावित झाले, पण न्यूयॉर्कच्या ‘आर्ट स्टुडंट्स लीग’मधील शिक्षक-चित्रकार नॉक्स मार्टिन यांची- कोणत्याही प्रभावापासून मुक्त राहून आपली वाट शोधण्याची- शिकवण बलवत्तर ठरली. अमेरिकेत एका जाहिरात संस्थेत काम करणारे मेल्ही बोधचित्रांत (इलस्ट्रेशन) प्रवीण होते. तिथे वरच्या पदांवर ते गेले आणि त्यांनी पुरस्कारही मिळवले; पण मुळात अभिजात संगीताची, शांतता आणि स्व-शोधाची आस असलेल्या मेल्हींना डहाणू खुणावू लागले आणि १९८० च्या दरम्यान मायदेशी परतून त्यांनी, अमेरिकेत सुरू केलेल्या अमूर्त चित्रकलेचा पूर्णवेळ पाठपुरावा सुरू केला.

मुलांसाठीची पाच चित्रमय पुस्तके त्यांनी १९६८ ते १९७३ या काळात लिहिली होती. यापैकी दोन पुस्तकांचे पुनर्मुद्रण हल्लीच ‘स्पीकिंग टायगर’ या प्रकाशनसंस्थेने केले; पण ‘रामू अँड द काइट’ हे त्यांचे पुस्तक खरे तर, त्यांची चित्रे समजण्यास सोपी करणारे ठरले असते, ते दुर्मीळच आहे. या पुस्तकात पतंगाच्या आकारावरले मेल्ही यांचे चिंतन सुलभपणे दिसते, तर पुढल्या आयुष्यातही त्यांच्या चित्रांच्या बाह्य़रूपातून (मधोमध रेघ, काही तिरक्या रेघा, मोजक्याच, पण काटेकोर रेघा) अतिशय व्यामिश्रपणे हे चिंतन दिसून येते.

भूमितीचे संगीत आपण ऐकू शकतो. चौल काळातील कांस्यमूर्तीपासून प्रकाशाच्या तिरिपेपर्यंत अनेक ठिकाणी भूमितीचे हे संगीत गुंजत असते, असा मेल्ही  यांचा विश्वास होता. रंग, आकार यांना पूर्ण नकार देऊन मला चित्र घडवायचे आहे, अशा चित्रातून लोकांनी केवळ सरळ रेषांची लय घ्यावी, अशी आस त्यांना होती.  ‘तुमच्या चित्रांत भारतीय काय?’ या थेट प्रश्नाला त्यांचे उत्तर होते- ‘संगीत! धृपद गायकीसारखे शांत संगीत’. हे संगीत ‘समजण्या’साठी प्रेक्षकाला सराव हवा; पण मेल्ही होते तेव्हा ते स्वत: चित्र समजण्यास मदत करीत. आता त्यांच्या चित्रांचे प्रेक्षक पोरके झाले आहेत.

First Published on September 15, 2018 3:10 am

Web Title: mehlli gobhai