News Flash

मायकेल कॉलिन्स

चंद्रापर्यंत दोनदा जाऊनही न उतरलेले, एकंदर २६६ तास अंतराळात काढलेले कॉलिन्स वयाच्या ९० व्या वर्षी निवर्तले.

मायकेल कॉलिन्स

‘त्या क्षणी मला एकाकीपणाची जाणीव झाली. सर्वथा एकटा होतो मी…’ हे वाक्य अस्तित्ववादी कादंबऱ्यांत ठीक; पण मायकेल कॉलिन्सने त्याच्या आठवणींच्या ‘कॅरिइंग द फायर : अ‍ॅन अ‍ॅस्ट्रोनॉट्स जर्नी’ या पुस्तकात लिहिले तेव्हा ते निर्विवाद वैज्ञानिक विधान ठरले! १९६९ सालच्या २० जुलै रोजी, चंद्रावर पहिल्यांदा मानवी पाऊल टाकले गेले तेव्हा नील आर्मस्ट्र्रांग आणि एडविन आल्ड्रिन या दोघा ‘चांद्रवीरां’सह तिसरा होता मायकेल कॉलिन्स. दोघांना चंद्रापर्यंत जाणाऱ्या ‘ईगल’ या उपयानात सोडून तो चंद्राभोवती घिरट्या घालू लागला आणि एका क्षणी त्याचा संपर्क तुटला- नील आणि एडविनशी, तसेच पृथ्वीशी! शास्त्रीयदृष्ट्या पुढले काही क्षण तो ‘एकाकी मानव’ होता. चंद्रापर्यंत दोनदा जाऊनही न उतरलेले, एकंदर २६६ तास अंतराळात काढलेले कॉलिन्स वयाच्या ९० व्या वर्षी निवर्तले.

ते मूळचे इटालियन. दोन महायुद्धांदरम्यान कुटुंबाने स्थलांतर केले, म्हणून शिक्षण अमेरिकेत झाले. १९५८ मध्ये ते वैमानिक या नात्याने अमेरिकी नौदलात दाखल झाले. तिथेच १९६० मध्ये चाचणी वैमानिकाचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. उड्डाणक्षेत्रातील जाणकारी आणि कौशल्य, तसेच शारीरिक/ मानसिक क्षमतांच्या तपासणीनंतर १९६३ च्या ऑक्टोबरात त्यांची ‘नासा’तर्फे अंतराळ तुकडीत निवड झाली. ही ‘नासा’ने निवडलेली तिसरी तुकडी होती. अंतराळात प्रत्यक्ष झेप घ्यायला मिळाली ती १८ जुलै १९६६ रोजी. ‘जेमिनी -१०’ यान चालवणारे कॉलिन्स, यानाबाहेर अंतराळात चालणारे तिसरे मानव ठरले. ‘अपोलो-११’ या पुढे यशस्वी ठरलेल्या चांद्र मोहिमेसाठी त्यांची निवड झाली तेव्हा प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार कोण, हेही ठरले होते. कॉलिन्स यांनी यान चालवायचे, संपर्कात राहायचे आणि जमेल तितके छायाचित्रण करायचे अशी तिहेरी कामे त्यांच्याकडे होती. छायाचित्रांसह कॉलिन्स यांनी केलेले चलच्चित्रण हा पुढे ऐतिहासिक ठेवा ठरला! १९७० मध्ये, म्हणजे अवघ्या चाळिशीत ‘नासा’तून निवृत्ती घेऊन स्मिथसोनियन संस्थेच्या अंतराळ संग्रहालयाचे ते संचालक झाले. या संस्थेने अगदी अलीकडे- कॉलिन्स यांना कर्करोग जडल्यानंतर- संग्रहालयातर्फे अंतराळविज्ञानातील कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव ‘मायकेल कॉलिन्स चषक’ असे केले. चांद्र मोहिमेची १५/ २५/ ३५/ ४५ आणि ५० वर्षे साजरा करण्यासाठी ‘व्हाइट हाउस’मध्ये निमंत्रित झालेले कॉलिन्स, वॉशिंग्टनमध्येच अंतराळ क्षेत्रातील सल्ला कंपनी चालवत. ‘पुन्हा चंद्रावर जाण्यापेक्षा अमेरिकेने थेट मंगळावर माणूस पाठवावा’ असे त्यांचे मत होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:09 am

Web Title: michael collins profile abn 97
Next Stories
1 प्रा. सुमन चक्रबर्ती
2 डॉ. आशा सावदेकर
3 अशोक तुपे
Just Now!
X