28 January 2021

News Flash

मायकल किंडो

सत्तरच्या दशकात भारताने हॉकीत मिळवलेल्या सुवर्णयशाचे शिलेदार ओडिशाचे जागतिक दर्जाचे बचावपटू आणि उमदे व्यक्तिमत्त्व मायकल किंडो यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला.

सत्तरच्या दशकात भारताने हॉकीत मिळवलेल्या सुवर्णयशाचे शिलेदार ओडिशाचे जागतिक दर्जाचे बचावपटू आणि उमदे व्यक्तिमत्त्व मायकल किंडो यांनी अलीकडेच जगाचा निरोप घेतला. १९७१ (तिसरे स्थान), १९७३ (उपविजेतेपद) आणि १९७५ (विजेतेपद) असे तीन विश्वचषक, १९७२ चे म्युनिक ऑलिम्पिक (कांस्य) आणि १९७४ ची आशियाई क्रीडा स्पर्धा (रौप्य) ही त्यांच्या यशोध्यायातील महत्त्वाची शिखरे. यांपैकी १९७५ मध्ये भारताने पाकिस्तानला हरवून विश्वविजेतेपदावर प्रथम आणि आजवरची अखेरची मोहोर उमटवली होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले आदिवासी हॉकीपटू ही विश्वविजेत्या चमूतील किंडो यांची विशेष ओळख. याचप्रमाणे १९७२ मध्ये अर्जुन पुरस्कार पटकावणारे ते पहिले आदिवासी क्रीडापटू. त्यामुळेच त्यांच्या खेळाचा झारखंड आणि ओडिशातील आदिवासी भागात मोठा प्रभाव पडला. किंडो यांच्या आधी जयपालसिंग मुंडा हे १९२८ च्या ऑलिम्पिकमधील कर्णधार भारताचे पहिले आदिवासी हॉकीपटू. परंतु ब्रिटिशांची राजवट असलेल्या त्या काळात जयपाल हे ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून शिकले; त्यामुळे त्यांची कारकीर्द घडण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत. याच कारणास्तव किंडो यांचे नाव सार्थ ठरते.

त्या वेळी बिहारमध्येच समाविष्ट असलेल्या रांचीतील रायघमा गावात किंडो यांचा जन्म झाला. कुर्डेग येथील बॉइज् मिडल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना किंडो यांना हॉकीचा लळा लागला. पुढे भारतीय सैन्यदलात रुजू झाल्यानंतर त्यांची हॉकी कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. १९६६ ते १९७३ अशी सलग आठ वष्रे त्यांनी राष्ट्रीय हॉकी स्पध्रेत सेनादलाचे प्रतिनिधित्व केले. १९७१ मध्ये सेनादलाचा सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. त्या वेळी सेनादलाच्या संघाचा हॉकीमध्ये विशेष रुबाब होता. अनेक आंतरराष्ट्रीय हॉकीपटूंचा या संघात भरणा होता. त्यामुळेच अभेद्य बचावातील गुणवत्तेच्या बळावर त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता आले. त्यानंतर सेनादल सोडून किंडो भारतीय रेल्वे संघात सामील झाले. १९७४ ते १९७७ अशी चार वष्रे रेल्वेच्या राष्ट्रीय विजेतेपदात किंडो यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९७८ ते १९८० या कालखंडात ते राऊरकेला येथील भारतीय स्टील प्राधिकरणाच्या संघात रुजू झाले. १९६९ मध्ये केनियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी भारताकडून पदार्पण केले. पण त्यानंतर भारतीय संघाकडून खेळण्यासाठी त्यांना एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. १९७१ मध्ये सिंगापूरला झालेल्या आग्नेय आशियाई विभागीय हॉकी स्पध्रेसाठी त्यांनी झोकात पुनरागमन केले. त्यानंतर पुढील पाच वष्रे भारतीय हॉकी संघाच्या सोनेरी दिवसांचे ते शिलेदार होते. १९७५ मध्ये निवृत्तीनंतर ओडिशामध्ये हॉकीच्या सेवेसाठी किंडो कार्यरत राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:31 am

Web Title: michael kindo mppg 94
Next Stories
1 पिअरे कारदँ
2 नि. कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार
3 बालम केतकर
Just Now!
X