19 January 2020

News Flash

मायकेल जी. रॉसमन

२०१६ मध्ये त्यांनी झिका विषाणूची रचना उलगडून मोठीच कामगिरी केली.

विषाणुजन्य रोगांचा मानवास फार मोठा धोका असतो याचे कारण एचआयव्हीसह अनेक विषाणू हे त्यांची रचना बदलत असतात. त्यामुळेच अगदी सामान्य सर्दीच्या विषाणूवरही आपल्याला यशस्वीपणे मात करता आलेली नाही. स्वाइन फ्लूसारख्या रोगातही रोजच्या रोज लोक बळी पडत आहेत. विषाणुजन्य रोगांवर उपचार शोधण्यासाठी ज्यांनी मूलभूत संशोधन केले त्यात मायकेल जी. रॉसमन यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने एक चांगला संशोधक आपण गमावला आहे. क्ष-किरण क्रिस्टलोग्राफीच्या मदतीने त्यांनी पहिल्यांदा सर्दीच्या विषाणूची रचना स्पष्ट केली होती! त्यानंतर ‘झिका’सारख्या रोगाच्या विषाणूची रचनाही त्यांनी उलगडली. विषाणूची रचना उलगडणे ही त्यावरील वैद्यकीय उपचार शोधण्याची महत्त्वाची पायरी असते. कारण त्याशिवाय या विषाणूवर प्रतिहल्ला करणारी जैविक व्यवस्था करता येत नाही. १९८५ मध्ये त्यांनी हे महत्त्वाचे संशोधन केले.

मायकेल रॉसमन यांचा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्टचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे कुटुंब ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी गणित व भौतिकशास्त्रात पदवी घेतली व नंतर भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर ग्लासगो येथून क्रिस्टलोग्राफी या रसायनशास्त्राच्या शाखेत पीएच.डी. केली. त्यानंतर ते विषाणूंच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील परडय़ू विद्यापीठात त्यांनी १९६४ पासून संशोधन केले. ५० वर्षे ते तेथे काम करीत होते. लंडनच्या रॉयल सोसायटीचे व राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य होते. वयाच्या ८८ व्या वर्षीही त्यांचा प्रयोगशाळेतील वावर उत्साही असे. रॉसमन यांनी कुन यांच्यासमवेत दोन महत्त्वाचे शोध लावले. त्यांनी २००२ मध्ये डेंग्यूच्या विषाणूची रचना शोधून काढली होती. त्यातून या डासामार्फत पसरणाऱ्या विषाणूवर औषधे शोधण्याचा मार्ग प्रशस्त झाला. २०१६ मध्ये त्यांनी झिका विषाणूची रचना उलगडून मोठीच कामगिरी केली. हाही विषाणू डासांमार्फतच पसरणारा असून त्याचा फटका ब्राझील ऑलिम्पिकच्या वेळी बसला होता. नुसती रचना शोधूनच ते थांबले नाहीत तर त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २०१८ मध्ये झिका विषाणूचे अधिक अचूक चित्र त्यांनी तयार केले त्यामुळे या विषाणूचा बंदोबस्त करणारी संयुगे व लशी तयार करण्याच्या कामाला गती मिळाली. १९७८ मध्ये त्यांना अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेचे फेलोपद मिळाले. लुईसा ग्रॉस हार्वित्झ पुरस्कार त्यांना १९९० मध्ये मिळाला, तर ग्रेगरी अमिनॉफ पुरस्कार त्यांना रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीने दिला होता. त्यांच्या जाण्याने विषाणूंचा कर्दनकाळ व जिंदादिल वैज्ञानिक आपल्यातून निघून गेला आहे.

First Published on May 23, 2019 1:05 am

Web Title: microbiologist michael g rossmann profile
Next Stories
1 हीरालाल यादव
2 बॉब हॉक
3 आय. एम. पेइ
Just Now!
X