केरळच्या भूमीने चित्रपटांची दृश्यभाषा जाणणारे अनेक गुणी कलावंत, तंत्रज्ञ दिले. अडूर गोपालकृष्णन, शाजी करुण, बालू महेन्द्र असे दिग्दर्शक दिले. या दिग्दर्शकांसाठी छायालेखन करणारे व केरळ सरकारचा छायालेखनासाठीचा प्रतिष्ठेचा राज्य पुरस्कार गेल्या २५ वर्षांत सात वेळा मिळविणारे एम. जे. राधाकृष्णन हेही अलीकडे दिग्दर्शन क्षेत्राकडे वळले होते. वयाच्या साठीनंतर त्यांची दिग्दर्शकीय कारकीर्द बहरणार, अशीच अपेक्षा अनेकांना होती. पण तसे होण्यापूर्वीच काळाने त्यांना ओढून नेले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी, १२ जुलै रोजी राधाकृष्णन यांचे निधन झाले.

जागतिक प्रतिष्ठेच्या ‘कान चित्रपट महोत्सवा’त छायालेखनासाठी दिला जाणारा कॅमेरा डि’ऑर हा पुरस्कार १९९९ सालच्या ‘मरणसिंहासनम्’ या चित्रपटासाठी त्यांना मिळाला होता. त्यानंतरही तीनदा ते कान महोत्सवासाठी स्पर्धेत होते. याखेरीज कोलकाता, कझान आदी ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील पुरस्कार तसेच न्यू यॉर्कच्या ‘दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवा’चा पुरस्कार (२००८) अशी दाद त्यांना मिळत गेली. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅण्डच्या भारतीय चित्रपट महोत्सवात त्यांनी २०१६ व २०१७ चे पुरस्कार मिळवले होते. अर्थात, चित्रपटकलेचा आणि शास्त्राचा भरपूर प्रसार झालेल्या केरळसारख्या राज्यात सात वेळा राज्य पुरस्कार मिळवणे, हीदेखील गौरवाचीच बाब. नैसर्गिक वातावरणात, हिरव्याजर्द पाश्र्वभूमीवरला फिकट सोनेरी प्रकाश, हे त्यांच्या छायालेखनाचे शैलीदार वैशिष्टय़ ठरले होते. ‘त्यांचा कॅमेरा बोलतो’ अशी प्रशंसा समीक्षकांनीही केली होती. हिंदीत ‘एक अलग मौसम’ हा (भूमिका : नंदिता दास, अनुपम खेर, रजित कपूर, रेणुका शहाणे) समांतर चित्रपट वगळता त्यांनी काम कमी केले. अलीकडे त्यांनी लघुपटांची निर्मिती केली होती आणि पूर्ण लांबीच्या चित्रपटाची जुळवाजुळव ते करीत होते.