27 October 2020

News Flash

मोहम्मद रसुलोफ

सत्य किंवा वास्तव सांगण्याची शिक्षा मिळण्याचा मानवी इतिहास फार दूरवरचा आहे. इ

मोहम्मद रसुलोफ

सत्य किंवा वास्तव सांगण्याची शिक्षा मिळण्याचा मानवी इतिहास फार दूरवरचा आहे. इराणच्या राजकीय दडपशाहीमध्ये आणि एकूणच मध्यपूर्वेतील राष्ट्रांच्या अपोषक वातावरणामध्ये साहित्य-संस्कृतीचा म्हणावा तसा विकास झाला नाही. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी ही नित्याची बाब असणाऱ्या इराणमधला सिनेमा मात्र दडपशाहीमुळेच अधिक उजेडात आला. अब्बास किरोस्तामी, मोहसिन मखमलबाफ, बहमन गोबादी या वास्तववादी इराणी दिग्दर्शकांना त्यांच्या देशाचे वाईट चित्र जगासमोर मांडल्याबद्दल वेळोवेळी सरकारी जाचाचा सामना करावा लागला. जितका जाच अधिक झाला तितकी बंडखोरी दाखवत या चित्रकर्त्यांनी आपला सिनेमा जगभर पोहोचविला. यंदाच्या कान महोत्सवात मोहम्मद रसुलोफ या इराणी राजवटीच्या तडाख्यातून उगवलेल्या शिलेदाराचा गौरव अधिकृत निवड झालेल्या (उन सर्टन रिगार्ड) चित्रपटांपैकी सवरेत्कृष्ट चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून  झाला आहे. ‘मॅन ऑफ इंटेग्रिटी’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार जाहीर झाला.

रसुलोफ यांचा एकही चित्रपट इराणमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. २०१० साली त्यांना जफर पहानी यांच्यासोबत विनापरवाना चित्रीकरण केल्याप्रकरणी अटक करून सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. ते सध्या जामिनावर असून जर्मनीत राहतात आणि जामीन वाढवून घेण्याची वेळ आल्यावर पुन्हा तेहरानला जातात. २०११चा त्यांचा चित्रपट ‘गुडबाय’ कानमध्ये पारितोषिक पटकावून गेला. २०१३ साली त्यांनी लेखक, साहित्यिक, कलाकारांच्या राजकीय गळचेपीबद्दल तयार केलेला ‘मॅन्युस्क्रिप्ट, डोण्ट बर्न’ हा सिनेमादेखील कान महोत्सवामध्ये गाजला होता.

तेहरानमध्ये १९७२ साली जन्मलेल्या रसुलोफ यांनी तेहरान विद्यापीठातूनच सामाजिक शास्त्रामध्ये पदवी घेतली. सभोवतालचे राजकीय वातावरण, समाजमन यांचा अभ्यास करतानाच त्यांच्यातील चित्रपटकार जागा झाला. या काळात इराणी दिग्दर्शक वास्तववाद आणत होते आणि फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमाने प्रेरित झालेल्या जागतिक सिनेमांच्या खुणा तरुण मनांना आकर्षित करीत होत्या. त्यांच्या सिनेमाकडे लक्ष गेले ते पूर्ण लांबीच्या ‘ट्वायलाइट’ या चित्रपटामुळे. २००२ सालातील या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय सिनेफेस्टिवल वर्तुळात नाव कमावले. त्यानंतर आयर्न आयलॅण्ड, व्हाइट मेडोज या चित्रपटांमधून त्यांनी इराणमधील समाजजीवनाचे जे दर्शन घडविले, त्यामुळे राजकीय वितुष्टाचा सामना त्यांना करावा लागला. लेखक-कलाकारांना मारण्याच्या एका सरकारी कटावर बेतलेला ‘मॅन्युस्क्रिप्ट, डोण्ट बर्न’ हा चित्रपट तर, हे राजकीय वितुष्ट आणखी वाढविणाराच ठरला. चित्रीकरणास परवानगी न घेतल्याच्या कारणावरून त्यांना अटक झाली असली, तरी त्यांनी जामीनकाळात आपल्या सिनेमाची मळलेली वाट सोडली नाही. एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या समाजातच कुणी कर्ताधर्ता युगपुरुष नाही, त्यामुळे चित्रपटामध्येच अशा प्रकारचा हिरो तयार करणे आवश्यक आहे. ‘सामाजिक जाणिवे’च्या प्रचारकी बाजाऐवजी समाजाची, देशाची सद्य:स्थिती दाखविणारा, त्यातील व्यंग शोधणारा संयत इराणी सिनेमा बनविण्याची हातोटी मोहम्मद रसुलोफ यांच्यात आहे. त्यांच्या चित्रपटातील स्त्री-पुरुष मागास भागांतही विचारांनी आधुनिक असतात आणि चित्रपटामधील सेक्सदर्शन अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरते. पण ते तेवढेच नसते.

शहरातून छोटय़ा खेडेगावामध्ये शेतघराची देखभाल करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट ‘मॅन ऑफ इंटेग्रिटी’ या यंदाचा कान महोत्सव गाजविणाऱ्या चित्रपटामध्ये आहे. खेडय़ामधला भ्रष्टाचार, लाचखोरी आणि दडपशाहीचे चित्रण यात आहे. सध्या इराणमधील राज्यकर्ते ज्या सुधारणेचे आश्वासन देत आहेत, ती सुधारणा मी चित्रपटांमधून देऊ इच्छित आहे. मग राज्यकर्त्यांना का अटक होत नाही, असा तिरका प्रश्न करून रसुलोफ आपल्या बंडखोरीचा झेंडा कायम फडकवता ठेवतात. चित्रपटांप्रमाणे वास्तव आयुष्यातही ते किती बंडखोर आहेत, ते यावरून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2017 1:55 am

Web Title: mohammad rasoulof iranian independent filmmaker
Next Stories
1 ग्रेग ऑलमन
2 प्रा. रॉजर बॉश
3 केपीएस गिल
Just Now!
X