अहमद पटेल, तरुण गोगोई यांच्यापाठोपाठ मोतीलाल व्होरा या तीन ज्येष्ठ नेत्यांचे महिनाभरात निधन हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्काच. यांपैकी पटेल आणि व्होरा हे गांधी-नेहरू घराण्याचे अत्यंत विश्वासू. बाबूजी नावाने परिचित असलेल्या व्होरा यांनी अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची तिजोरी सांभाळली. पत्रकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात केलेले व्होरा समाजवादी चळवळीतून राजकारणात आले. आता छत्तीसगडमध्ये असलेल्या दुर्गच्या नगरपालिकेत ते निवडून आले. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि १९७२ पासून मार्च २०२० पर्यंत कोणत्या ना कोणत्या पदावर ते कायम राहिले. मध्य प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे चार वेळा खासदार, काँग्रेस पक्षाचे खजिनदार अशी विविध पदे त्यांनी पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत भूषवली. अर्जुनसिंग यांची पंजाबच्या राज्यपालपदी निवड झाल्यावर त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर व्होरा यांची निवड करण्यास राजीव गांधी यांना भाग पाडले होते. राज्यमंत्रिपदावरून व्होरा यांना थेट मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. अर्जुनसिंग मध्य प्रदेशच्या राजकारणात परतल्यावर व्होरा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पुन्हा वर्षभरातच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी त्यांची फेरनिवड झाली.

मात्र, उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्होरा यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा बसपने पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर लखनौच्या शासकीय विश्रामगृहात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मायावती यांच्यावर झालेला हल्ला देशभर चांगलाच गाजला. त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राज्यपाल व्होरा यांनी मुलायमसिंह सरकार बरखास्त करून मायावती यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. मुलायम यांच्याकडे बहुमत आहे वा नाही हे सभागृहात सिद्ध होणे आवश्यक असताना, व्होरा यांनी त्यांचे सरकार बरखास्त केले होते. मायावती सरकार अल्पमतात गेल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारसही त्यांनी केली होती. या साऱ्या घडामोडींमुळे व्होरा यांची राज्यपालपदाची कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली.

२००० ते २०१८ या काळात व्होरा यांनी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळल्या. पक्षाकडे ठरावीक दिवशी निधी जमा झालाच पाहिजे, असा व्होरा यांचा दंडक असे. अन्यथा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा संबंधित नेत्याला दूरध्वनी येत असे. गांधी घराण्याशी ते कायम एकनिष्ठ राहिले. वयाची नव्वदी पार केली तरी उत्साह कायम असायचा. दररोज काँग्रेस मुख्यालयात हजेरी लावून येणाऱ्या प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकू न घेत असत. जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये मेळ साधला जात नसताना, व्होरा यांच्यासारख्या नेत्याची काँग्रेस पक्षाला आवश्यकता होती.