राजकारणात असतानाही साहित्यसेवेसाठीच अधिक ओळखल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेल्या गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची निधनवार्ता बुधवारी आली. राजकारणापेक्षा त्यांचे  योगदान साहित्यक्षेत्रात मोठे आहे.

मृदुला यांचा जन्म बिहारच्या मिथिला भागातील मुझफ्फरपूर जिल्ह्यच्या एका खेडय़ातला. छपरा जिल्ह्यतील एका लहान शाळेत व नंतर लखीसराय जिल्ह्यतील निवासी कन्याशाळेत त्यांचे शिक्षण झाले. पदवी हाती पडण्यापूर्वीच जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते रामकृपाल सिन्हा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी व बी.एड.चीही पदवी मिळवली. यानंतर काही दिवस त्या मोतिहारी येथील एका महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य होत्या. मात्र नोकरीत फार दिवस त्यांचे मन लागले नाही. पतीला आचार्य पदवी मिळाल्यानंतर नोकरीला रामराम ठोकून त्यांनी साहित्यसेवेला वाहून घेतले.

पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनाआधारे मृदुला यांनी लघुकथा लिहिण्यास सुरुवात केली. भारतीय संस्कृतीची वैशिष्टय़े आणि खेडय़ांतील परंपरा यांत त्यांना रुची होती. याच विषयांवर, तसेच पतीसोबत ज्या खेडय़ांमध्ये काम केले, तेथून गोळा केलेल्या लोककथांवर आधारित लघुकथा त्यांनी लिहिल्या. यापैकी अनेक कथा हिंदी मासिकांतून प्रकाशित झाल्या. नंतर ‘बिहार की लोककथाएँ’ या शीर्षकाने दोन भागांमध्ये त्या संकलित करण्यात आल्या. राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या ‘एक थी रानी ऐसी भी’ या जीवनचरित्रपर पुस्तकावर नंतर याच नावाने चित्रपटही काढण्यात आला. चरित्र, कादंबऱ्या, लेखसंग्रह, कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी हिंदीतील मोठी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.

ही साहित्ययात्रा समृद्धपणे सुरू असताना सामाजिक जीवनाशी संबंध येऊनही राजकारणात – त्यातही निवडणुकीच्या राजकारणात-  मृदुला यांना मुळीच रस नव्हता.  पती रामकृपाल सिन्हा हे बिहार मंत्रिमंडळात मंत्री झाले. त्यांच्या  प्रचारार्थ मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचताना, स्थानिक परंपरा व संस्कृतीचे बारकावे यामुळे महिलांशी संवाद वाढण्याचा अनुभव मृदुलांना आला.

जयप्रकाश नारायण यांच्या ‘समग्र क्रांती’ आंदोलनात मृदुला यांचा सक्रिय सहभाग होता. येथूनच नकळत त्या राजकारणात आल्या आणि भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली. २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजप महिला मोर्चाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. ऑगस्ट २०१४ ते ऑक्टोबर २०१९ या काळात त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सिन्हा यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. ‘या निर्णयामुळे मृदुला सिन्हा यांची गोव्याच्या राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली. रोज गोपूजन करण्याचा आचार कायम ठेवण्यासाठी त्यांनी राजभवनातच एक गाय -वासरू यांचा निवारा उभारला. आलीशान जीवनशैलीबाबतही त्या टीकेच्या विषय झाल्या आणि या खर्चावर कुणी प्रश्न विचारू नये म्हणून माहिती अधिकार कायदा कमकुवत केल्याचीही टीका त्यांच्यावर झाली. सिन्हा या साहित्यिक म्हणून अधिक मोठय़ा होत्या, मात्र ,साहित्यापेक्षा राजकारणात जास्त प्रसिद्धी मिळते, याचे त्या उदाहरण होत्या.