ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हॉकीमध्ये एकेकाळी सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या भारतीय संघाची १९६४ पासून अधोगतीच होत गेली. मात्र मॉस्को येथे १९८० मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पुन्हा सुवर्णपदक मिळविले. सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्यासारखी प्रभावी शैली लाभलेला मोहंमद शाहीद याचा मॉस्कोमधील सुवर्णपदकात सिंहाचा वाटा होता.

या ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियासह अनेक बलाढय़ संघ सहभागी झाले नव्हते. त्यामुळे हे यश म्हणजे वासरात लंगडी गाय अशी टीका अनेक वेळा झाली. तथापि सुवर्णपदक हे केव्हाही प्रतिष्ठेचेच असते.  कारण  पाकिस्तानसारखा पारंपरिक प्रतिस्पर्धी आपल्याला आव्हान देणारा होता. शाहीद यांची शैली खूपच वेगळी होती. कोणत्याही सराव शिबिरात शिकविल्या जाणाऱ्या तंत्रापेक्षाही वेगळेच तंत्र त्यांच्याकडे होते. उपजतच त्यांच्याकडे आक्रमक खेळाची शैली होती. वाराणसी येथे जन्म झालेल्या या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १९७९ मध्ये सुरू झाली. कनिष्ठ गटाच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. ड्रिबलिंग, खणखणीत फटके, चेंडूवरील नियंत्रण, वेगाने चाली करणे या तंत्रात ते माहीर होते. त्यामुळेच लगेचच त्यांना ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात पाचारण करण्यात आले. या स्पर्धेआधी झालेल्या आगाखान चषक राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी आपल्याकडे असलेल्या अष्टपैलू खेळाचा सातत्याने प्रत्यय घडविला होता. त्यांच्याकडे चेंडू आला की थेट प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टपर्यंतच ते धडक मारीत असत. जफर इक्बाल यांच्यासह तत्कालीन खेळाडू आपल्याबरोबर आघाडी फळीत शाहीद यांच्यासाठीच आग्रह धरीत असत. शाहीद यांनी भारतास १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर १९८६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले. त्यांनी १९८५-८६मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना भारतास चांगले यश मिळवून दिले. १९८६ मध्ये आशियाई सर्वकालीन संघ तयार करण्यात आला होता. त्यामध्येही शाहीद यांना स्थान देण्यात आले. हॉकीतील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘अर्जुन’ व ‘पद्मश्री’ सन्मानही मिळाला. रेल्वेत नोकरी करीत असतानाही त्यांनी अनेक हॉकीपटूंना रोजगाराची संधी कशी मिळेल यासाठी खूप धडपड केली. शाहीद यांचा अखेरचा काळ खूप संघर्षमय गेला. पोटातील आजाराने त्यांना जखडले व त्यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना धनराज पिल्ले यांच्यासह अनेक खेळाडूंनी शासनाने त्यांना साहाय्य करावे, असे आवाहन केले होते. नंतर रेल्वे व्यवस्थापनाने शाहीद यांच्यावरील उपचाराची सर्व जबाबदारी आपण घेतली असल्याचा खुलासा केला. ज्या खेळाडूंनी भारतास सोनेरी यश मिळवून दिले त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखकारक होईल याची जबाबदारी संबंधित खेळांच्या राष्ट्रीय संघटनेने स्वीकारली पाहिजे.