News Flash

मुकुंद नानिवडेकर

प्रत्येक शहराची काही भूषणावह स्थाने असतात तसेच नागपुरातील बर्डीवरील राजाराम वाचनालय आहे.

वाचनालयाच्या क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारे एक चालतेबोलते विद्यापीठ म्हणजे मुकुंद नानिवडेकर. पांढऱ्या किंवा कुठल्याही फिक्कट रंगाचा शर्ट आणि फिक्याच रंगाची विजार. डोक्यावर कायम भांग पाडलेला. अगदी पाच फुटांचा देह आणि चेहऱ्यावर नेहमी एक प्रसन्न हास्य. हे हास्य जणू बर्डीवरील राजाराम वाचनालयाचे प्रतीक झाले होते. परवा नानिवडेकर गेले आणि राजाराम वाचनालयातील हे निरलस हास्य पुन्हा अनुभवता येणार नाही, या भावनेने वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकाची मने हेलावली.

प्रत्येक शहराची काही भूषणावह स्थाने असतात तसेच नागपुरातील बर्डीवरील राजाराम वाचनालय आहे. पूर्ण शतकाची परंपरा लाभलेल्या या वाचनालयाची गेल्या अनेक वर्षांपासून वैचारिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचे मोठे श्रेय वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह मुकुंद नानिवडेकर यांचे आहे. आयुष्याची ५० पेक्षा जास्त वर्षे राजाराम वाचनालयाच्या सेवेत घालवून त्यांनी बालगोपालांपासून ज्येष्ठ नागरिकांना वाचनाची गोडी निर्माण केली.

कोकणातून नागपुरात स्थायिक झालेल्या नानिवडेकर कुटुंबातील मुकुंदकाका नानिवडेकर यांची जन्म आणि कर्मभूमी ही नागपूरच ठरली. पटवर्धन आणि त्यानंतर हिस्लॉप महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेत अनेक वर्षे काम केले. त्याच काळात  जनार्दन स्वामी यांच्या सान्निध्यात काम करताना वाचनालयात स्वामींना एक दिवस आमंत्रित करण्यात आले होते. त्या काळात वाचनालयाची स्थिती बघता नानिवडेकर यांना स्वामींनी वाचनालयाची सेवा करा म्हणून आदेश दिला आणि तेव्हापासून त्यांनी वाचनालयाच्या कार्याला वाहून घेतले. वयाची ८० पार केली तरी त्यांचा उत्साह हा एखादा तरुणांना लाजवेल असा होता. वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी वाचनसंस्कृती जोपासली.

आधुनिक काळात प्रगत तंत्रज्ञानामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली असताना त्यांनी वाचनालयाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू केले. बाल साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केले. गायन, वाचन, हस्ताक्षर आदी स्पर्धाचे आयोजन केले, त्यांचे सातत्य जपले. वाचनालय म्हणजे त्यांच्यासाठी मंदिर व तेथे उपलब्ध असलेले मराठी दुर्मीळ ग्रंथ आणि इतर पुस्तकांवर त्यांनी देवासम प्रेम केले.

राजाराम वाचनालयात सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यात सादर होणारे पारंपरिक वैचारिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आयोजित केले जात. त्यातून त्यांनी मोठा वर्ग निर्माण केला. वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी लता मंगेशकर, संगीतकार व गायक सुधीर फडके यांच्या स्मृतीनिमित्त स्पर्धा सुरू केल्या होत्या. आज त्यांच्या जाण्याने या विधायक कार्याचा वेगच मंदावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:05 am

Web Title: mukund nanivadekar
Next Stories
1 नझीर अहमद वानी
2 रसेल बेकर
3 विश्वेश्वर दत्त सकलानी
Just Now!
X