विश्वाची रचना उलगडण्यात अनेक वैज्ञानिकांचे उभे आयुष्य सरले, त्यात मरे गेलमान हे एक होते. त्यांच्या निधनाने विश्वनिर्मिती संशोधनातील एक दुवा काळाच्या पडद्याआड गेला आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख. त्यात त्यांनी अणूच्या उपकणांची अनेक रहस्ये उलगडली. त्यांचे काम फार व्यापक होते. त्यांनी अर्थशास्त्र, हवामान यासह सर्वच क्षेत्रांत गुंतागुंतीचे सिद्धांत कसे काम करतात यावरही संशोधन केले होते. क्वार्कस्ची संकल्पना त्यांनी अधिक बारकाईने मांडली. हे अणुगर्भातील उपकण असतात. १९६४ पर्यंत अणुकेंद्रकात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन हे तीनच कण असतात असे मानले जात होते, पण प्रोटॉन व न्यूट्रॉनमध्येही काही उपकण असू शकतात, असे गेलमान यांचे म्हणणे होते. १९५०च्या  सुमारास अणुभंजनाची यंत्रे शोधण्याची चढाओढ असताना त्यांनी अनेक मूलभूत कण शोधून काढतानाच त्यांचे गुणधर्मही सांगितले. त्यांच्यातील गणितीय समिती शोधली. मेंडेलिव्हने जशी मूलद्रव्यांची सारणी तयार केली तशी पद्धत गेलमान यांनी अणूच्या उपकणांसाठी वापरून त्यांचा तुलनात्मक लेखाजोखा मांडला.

सहकारी भौतिकशास्त्रज्ञ बॉब सर्बर यांनी त्यांना एकदा इलेक्ट्रॉन व प्रोटॉनच्या विद्युतभाराबाबत कोडय़ात टाकणारे प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी नॅपकिनवर समीकरणे मांडून तत्काळ उत्तर दिले होते; पण ते कधीच आपल्याला गवसलेले ज्ञान हे अंतिम मानत नसत. क्वार्कची त्यांनी मांडलेली शक्यता नंतर प्रत्यक्षात आली. प्रमाणित प्रारूपात बसणारे बरेच संशोधन त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी गुंतागुंतीचे व बहुआयामी प्रश्न सोडवण्याच्या ‘सायन्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ या वेगळ्या प्रांतात मुशाफिरी करून भाषाशास्त्र, जीवशास्त्र यासह अनेक गोष्टींना कवेत घेत जेम्स हार्टल यांच्यासमवेत शोधनिबंध सादर केले. महासूत्रसिद्धांत हा अवैज्ञानिक आहे, असे सांगणाऱ्या वैज्ञानिकांवर त्यांनी टीका केली होती. अणूमधील कणांचे आठ गटात वर्गीकरण करून त्याला त्यांनी बुद्धांच्या अष्टमार्ग ज्ञानसाधनेचे नाव दिले होते. जेम्ल जॉइसच्या फिनेगन्स वेकमधील ‘थ्री क्वार्कस् फॉर मस्टर मार्क’ या वाक्यावरून त्यांनी अणूतील नव्या कणांना ‘क्वार्क’ असे नाव ठेवले होते. १९६९ मध्ये अणूच्या उपकणांच्या वर्गीकरणासाठी त्यांना भौतिशास्त्राचे नोबेल मिळाले. त्यांचा जन्म न्यूयॉर्कचा. येल विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवीनंतर एमआयटीतून पीएचडी असा त्यांचा आलेख उल्लेखनीयच होता. १९९४ मध्ये त्यांनी गुंतागुंतीच्या प्रणालींवर ‘द क्वार्क अँड द जग्वार’ हे पुस्तक लिहिले. पुंज भौतिकीकडून सुरुवात करीत त्यांनी जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणाऱ्या कूट प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांची कामगिरी अष्टपैलू होती यात शंका नाही.