तेलुगुतील सामर्थ्यशाली लेखक, नाटककार तसेच चित्रपट कथालेखक व अभिनेते अशी त्यांची ओळख होती, पण त्यांचे सर्वात जास्त प्रेम साहित्यावर होते. त्यामुळेच त्यात ते रमले. जवळपास दीडशे चित्रपटांसाठी संवादलेखन करून तेलुगु चित्रपटसृष्टीवर छाप पाडणाऱ्या तसेच ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्काराने सन्मानित अशा या बहुरूपी व्यक्तिमत्त्वाचे नाव एम. व्ही. एस. हरनाथा राव. त्यांच्या निधनाने तेलुगु नाटय़, साहित्य व चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. तिसऱ्या इयत्तेत असताना त्यांनी एका नाटकात काम केले आणि तरुणपणी नाटय़लेखनास सुरुवात केली. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे त्यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झाले. त्यांचे वडील कारकून होते. ते त्यांना नेहमी पौराणिक नाटकांना घेऊन जात असत, तर आई सत्यवती देवी यांनी कर्नाटक संगीतात पदविका घेतलेली होती. संवादलेखक म्हणून त्यांनी एकूण दीडशे चित्रपटांना शब्दसाज दिला. त्यात ‘प्रतिघटना’, ‘भारत नारी’, ‘अण्णा’, ‘अमायी कापूरम’ या चित्रपटांचा समावेश होता. त्यांना चार वेळा आंध्रातील प्रतिष्ठेचा नंदी पुरस्कार मिळाला होता. चित्रपट निर्माते टी. कृष्णा यांच्या माध्यमातून ते चित्रपट क्षेत्रात आले व सुरुवातीला पटकथा व संवादलेखक म्हणून काम केले. त्यात ‘स्वयमकृषी’ व ‘सुत्राधारलू’ या चित्रपटांचा समावेश होता. यात ‘रक्षासुडू’ व ‘स्वयमकृषी’ चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. एकूणच त्यांचे लेखन हे आधुनिकतेकडे झुकणारे होते.

‘रक्ताबाली’ हे त्यांचे पहिले नाटक  चांगलेच गाजले. विजयवाडा येथे असताना त्यांनी अनेक नाटके पाहिली होती. त्यामुळे त्यांचे जीवन सांस्कृतिक व साहित्यजाणिवांनी परिपूर्ण होते. त्यांनी जगन्नाथाच्या रथचक्रावर ‘जगन्नाथ रथ चक्रालू’ हे नाटक लिहिले होते, पण त्यात देवाचे तात्त्विक पातळीवर अस्तित्व मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर कोडावटिगंटी, गोरा व अत्रेय समुदायाने टीका केली. आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार त्यांच्या ‘कन्यावर सुल्कम’ या नाटकास मिळाला, तर ‘क्षीरसागर मंथनम’साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. काही नाटकांना त्यांनी संगीतही दिले. आंध्र नाटय़ परिषदेच्या स्पर्धेत १९८० मध्ये त्यांच्या चार नाटकांना वीस पुरस्कार मिळाले होते. ‘अंचम कडीडी आरंभम’, ‘यक्षगानम’, ‘रेडलाइट एरिया’, ‘मी परिमिती’, ‘प्रजाकवी वेमना’ ही त्यांची इतर नाटके. त्यांच्या ‘लेडी चंपिना पुली नेटुरू’ व ‘अरण्य रोदनम’ या दोन नाटकांचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले. राव हे डाव्या विचारसरणीकडे झुकणारे लेखक होते व त्यांनी कृष्णा यांच्यासमवेत ‘नेटी भारतम’, ‘देसमलो डोंगालू पडारू’ हे चित्रपट केले. त्यांची विचारप्रवृत्त करणारी लेखणी ‘प्रतिघटना’, ‘भारत नारी’, ‘अण्णा’ व ‘अमायी कापूरम’ या चित्रपटांत धारदार रूप घेऊन येते. त्यांच्या ‘कन्या वरा सुल्कम’ या नाटकात आधुनिक तेलुगु महिलेचे चित्रण अतिशय समर्थपणे सामोरे येते. त्यांनी समकालीन स्त्रियांची पात्रे व्यवस्थेविरोधात बंडखोरी करताना दाखवली. ते एक चांगले नाटककार होते. त्यामुळे या क्षेत्रातील पुरोगामी चळवळीला धक्का बसला आहे.