‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ शिक्षणाची महती सांगताना महात्मा फुलेंनी वापरलेल्या या शब्दांचा आधार घेत आयुष्यभर समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या नलिनी लढके यांच्या निधनाने सत्यशोधक चळवळीची मोठी हानी झाली आहे. अमरावती जिल्ह्य़ातील सातेगावात नलिनीताई हाडाच्या शिक्षिका होत्या. आयुष्याच्या प्रारंभीच्या टप्प्यात त्यांना मागास (कोल्हाटी) जातीत जन्म घेतला म्हणून अनेकदा सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. हे दु:ख पचवत त्यांनी आयुष्यभर स्वत:ला सत्यशोधक चळवळीसाठी वाहून घेतले. आंतरजातीय विवाहांना सामाजिक मान्यता नसतानाच्या काळात त्यांनी दलित मुक्ती चळवळीत काम करणारे आनंदराव लढके यांच्याशी विवाह केला. नंतर या दोघांनी वऱ्हाड प्रांतात शिक्षण प्रसारासाठी वाहून घेतले. दलित व बहुजन समाजातील मुलींना शिक्षण घेता यावे, यासाठी नलिनीताईंनी विदर्भात बरीच पायपीट केली. अनेकींना स्वखर्चाने शिकवले. त्यांचे विवाह लावून दिले. हिंदू कोड बिलाला विरोध सुरू झाला तेव्हा त्याच्या समर्थनार्थ सभा, मोर्चे, परिसंवाद आयोजित करून जनजागृती करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. देवदासी प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्यात सुरू झालेल्या आंदोलनातही त्या अग्रेसर राहिल्या. केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर लोकशिक्षणाचीही गरज आहे, यासाठी कायम आग्रह धरणाऱ्या नलिनीताईंना आदर्श शिक्षकाचा राष्ट्रीय सन्मान देऊन गौरवण्यात आले. समाजाचे केवळ राजकीय प्रबोधन करून चालणार नाही, तर सामाजिक प्रबोधनही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे सांगत मानवधर्माचा प्रसार करणाऱ्या नलिनीताईंना दलितमित्र हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या जाणिवा विस्तारित करणाऱ्या बाबी आहेत, हे पटवून देत आयुष्यभर समाजपरिवर्तनासाठी त्यांनी काम केले.
डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या कुटुंबात जन्म घेऊनसुद्धा सत्यशोधक चळवळीत सक्रिय झाल्यानंतर देव न मानण्याची शपथ घेणाऱ्या नलिनीताई खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होत्या. कर्मकांड, जातपात यातून स्त्रियांची प्रगतीच होऊ शकत नाही, हा विचार त्यांनी ग्रामीण भागात दौरे करून पटवून दिला. अमरावतीच्या नगरपालिका शाळेत शिक्षिका असलेल्या नलिनीताईंनी स्त्रियांच्या चळवळी सुरू होण्याच्या आधी समाजातील अनिष्ट प्रथा व स्त्रियांच्या कुचंबणेविरुद्ध वऱ्हाडात अनेक लढे उभारले. त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. समाज परिवर्तनासाठी झटताना अनेकदा त्यांनी शिक्षण खात्यातील वरिष्ठांचा रोष ओढवून घेतला व निलंबित झाल्या. तरीही निष्ठा अचल ठेवून, शिक्षित महिलांना समाज परिवर्तनाच्या लढय़ात जोडण्यात त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांच्या निधनाने जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक चळवळीचा वारसा निष्ठेने चालवणारा शिलेदार विदर्भाने गमावला आहे.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”