वृत्तपत्रांचा मुख्य उद्देश हा सत्याचा शोध घेणे हा असतो. यात सत्य शोधणे कठीण मानले तरी त्याच्या जवळपास पोहोचण्याचे प्रयत्न करता येतात. ‘द वीक’ नियतकालिकाच्या पत्रकार नम्रता आहुजा यांनी असाच प्रयत्न त्यांच्या अनेक वार्ताकनातून केला आहे. त्यामुळेच त्यांना यंदाचा इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिटय़ूटचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्याप्रत पोहोचणारे वार्ताकन करण्याची जिद्द जिवावर बेतू शकते हे दरवर्षी पत्रकारांच्या होणाऱ्या वाढत्या हत्यांमधून लक्षात येते, कारण या वार्ताकनात संबंधित पत्रकार हा अनेक हितसंबंधी गटांचे शत्रुत्व ओढवून घेत असतो. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न फार थोडे पत्रकार करतात, त्यात आहुजा एक आहेत. अलीकडे त्यांनी सीबीआयमध्ये सुरू असलेल्या वादळी घडामोडींचेही बारकाईने वार्ताकन केले आहे. पण त्यांना ज्या वृत्तलेखासाठी पुरस्कार मिळाला त्याचे नाव ‘इनसाइड सिक्रेट नागा स्टेट’ असे होते. नागालँडमधील घडामोडींचा वेध घेताना त्यांनी तेथील गुप्त नागा राजवट, त्यांच्या मंत्रालयांचे काम, नागा मंत्री व अधिकारी यांच्या मुलाखती हे सगळे धाडसाने मांडले आहे. त्यासाठीच त्यांना दोन लाखांचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सत्यान्वेषक वृत्तीने केलेल्या वार्ताकनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. २०१७ मध्ये दी इंडियन एक्स्प्रेसच्या रितू सरीन यांना पनामा पेपर्समधील बडय़ा भारतीय लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता. २००३ मध्ये पहिला पुरस्कारही दी इंडियन एक्स्प्रेसलाच गुजरात दंगलीच्या वार्ताकनासाठी मिळाला होता. ज्यासाठी आहुजा यांना २०१८ मध्ये हा पुरस्कार मिळाला तो नागा बंडखोरांचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. त्यात २०१५ मध्ये एक अंतिम करारही झाला होता. नागा बंडखोरांनी भारतातून फुटून निघण्याची मागणी पूर्वीच केली होती, पण पंडित नेहरू यांनी ती फेटाळली. नंतरच्या पंतप्रधानांनी त्यावर वाटाघाटी सुरू ठेवल्या, त्यानंतर मोदी सरकारने एक चौकटबद्ध करारास आकार दिला. हे सगळे होत असताना आहुजा यांनी या प्रश्नाचा वेध घेण्यासाठी नागालँड गाठले असता त्यांना तेथील हेब्रॉन या लहानशा भागात नागा सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड ही संघटना समांतर सरकार चालवत असल्याचे दिसून आले. त्यांची वेगळी मंत्रालये असून ते वेगळा कर वसूल तर करतातच, शिवाय त्यांचे १५ हजारांचे सैन्यही आहे.त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर काश्मीरसारखे नवे दुखणे तयार होण्याची शक्यता आहे. आहुजा यांनी या सगळ्या वस्तुस्थितीची उत्तम कथनशैली तंत्र व छायाचित्रांसह मांडणी केली आहे. हे सगळे करण्याला धाडस लागते हे विसरता येणार नाही.