12 August 2020

News Flash

नारायण रेड्डी

‘किंग्ज ऑफ २००० एग्ज’ या ऑगस्ट २०१७ च्या पहिल्या सादरीकरणानेच याचा पुढील प्रवास कसा होणार, याची चुणूक दिसली.

नारायण रेड्डी

समाजमाध्यमांवरील दृक्श्राव्य सादरीकरणातील सूत्रधार अगदी विनवण्या करकरून ‘लाइक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा’ असे सांगत असतो. पण यातले काहीही न बडबडतादेखील तब्बल ६४ लाख वर्गणीदार असणारी यूटय़ूब वाहिनी म्हणजे- ‘ग्रॅण्डपा किचन’! या सादरीकरणाचे एकहाती नायक म्हणजे मंद स्मित करत, मिशीला पीळ भरून शे-दोनशे अनाथ मुलांसाठी अगदी लीलया एखादा भला मोठा खाद्यपदार्थ तयार करणारे नारायण रेड्डी! ‘लव्हिंग, केअिरग, शेअिरग, धिस इज माय फॅमिली’ अशी साद घालत खुल्या आकाशाखालच्या स्वयंपाकघरात शांतपणे काम करणाऱ्या ७३ वर्षीय नारायण रेड्डी यांचे नुकतेच (२७ ऑक्टोबरला) निधन झाले.

यूटय़ूबवर ‘ग्रॅण्डपा किचन’ हे नाव वाचल्यावर कदाचित हा कोणता तरी कुकरी/फूड शो असावा, असेच वाटू शकते. खाद्यपदार्थाशीच संबंधित असला तरी हा कार्यक्रम रेसिपी सांगणारा पठडीबद्ध असा रटाळ आणि अति बडबडीचा कार्यक्रम नाही. त्यामुळे अल्पावधीतच ‘गॅ्रण्डपा किचन’ यूटय़ूबवर लोकप्रिय झाले. जगाच्या कानाकोपऱ्यांतील प्रेक्षकांनी त्यावर पसंतीची मोहोर उमटवली. नारायण रेड्डी यांचा नातू श्रीकांत रेड्डी याच्या संकल्पनेतून ही यूटय़ूब वाहिनी दोन वर्षांपूर्वी जन्माला आली. ‘किंग्ज ऑफ २००० एग्ज’ या ऑगस्ट २०१७ च्या पहिल्या सादरीकरणानेच याचा पुढील प्रवास कसा होणार, याची चुणूक दिसली. अनाथ मुलांसाठी अन्न शिजवणे हा या उपक्रमाचा मुख्य गाभा. यूटय़ूबच्या माध्यमातून मिळणारा निधी, तसेच क्राऊड फंडिंग यातून मुलांसाठी अन्नाचा खर्च निघायचा. पण त्याचबरोबर तो पदार्थ तयार करतानाचे नारायण रेड्डी अनुभवणे हादेखील आनंदाचा आणखीन एक भाग.

वाचला, पाहिला जाणारा विषय म्हणून खाद्यपदार्थाशी संबंधित अनेक लेख व सादरीकरणे हल्ली सर्वत्रच खंडीभर पाहायला मिळतात. पण त्यामध्ये सूत्रधाराची अगम्य अशी रटाळ बडबड आणि अनावश्यक सल्लेच ऐकायला लागतात. पण रेड्डी ज्या सहजतेने एखादा पदार्थ शिजवतात, तेव्हा त्यांची देहबोली पाहण्यासारखी असायची. सत्तरी ओलांडलेले रेड्डी साधी लुंगी आणि सदरा घालून, मिश्कील हसत मिशीला पीळ देत कॅमेऱ्यासमोर लीलया वावरत. एखाद् दुसरा शब्दच उच्चारत शांतपणे काम करत. मोठाल्या चुलाण्यावर भल्या मोठय़ा भांडय़ात पदार्थ शिजत राही व कार्यक्रमातही रंग भरे. केवळ १०-१२ मिनिटांचे प्रभावी व्हिडीओ तयार करणे हे त्यांच्या तांत्रिक चमूचे काम. पण या सर्वाचा आत्मा होते गॅ्रण्डपा नारायण रेड्डीच! त्यांच्या साधेपणाला आणि सामाजिक भानाला म्हणूनच नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. देहात जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत काम करत राहायचे, हे त्यांचे साधेसोपे तत्त्वज्ञान. त्याचप्रमाणे ते जगले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 12:07 am

Web Title: narayan reddy profile abn 97
Next Stories
1 प्रा. मोहन आपटे
2 डॉ. सुधीर रसाळ
3 अरविंद इनामदार
Just Now!
X