आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रात युरोपीय देशांची मक्तेदारी असते. मात्र त्यांच्या महासत्तेस सुरुंग लावत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंदर बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले आहे. या सर्वोच्च पदावर प्रथमच एका भारतीयाची निवड झाली. या महासंघाचे ते पहिलेच बिगरयुरोपीय अध्यक्ष आहेत. त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आर्यलडचे डेव्हिड बलबर्नी व ऑस्ट्रेलियाचे केन रीड यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला. राष्ट्रीय स्तरावरील मतभेदांमुळे आंतरराष्ट्रीय महासंघातूनच भारताला हद्दपार करण्याची वेळ आली होती; तथापि बात्रा यांनी हॉकी इंडियाची धुरा घेतल्यानंतर महासंघाचा विश्वास संपादन केला. गेल्या तीन वर्षांमध्ये भारतास अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. त्याखेरीज कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटांच्या विश्वचषक स्पर्धाचे संयोजनपद भारतास मिळाले आहे.

हॉकी हा राष्ट्रीय खेळ असूनही त्याला अपेक्षेइतकी लोकप्रियता मिळत नाही. आर्थिक मोबदल्याअभावी खेळाडू या खेळात करिअर करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात, हे लक्षात आल्यानंतर बात्रा यांनी आयपीएल स्पर्धेप्रमाणेच हॉकी इंडिया लीगचे आयोजन सुरू केले. या स्पर्धेत परदेशातील अनेक ऑलिम्पिकपटूंनीही सहभाग नोंदविल्यामुळे भारतीय खेळाडूंना आर्थिक फायदा झाला. एवढेच नव्हे तर या खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय प्रगती झाली आहे. लीगचे सामने अनेक ठिकाणी आयोजित केल्यामुळे प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. खेळाडूंना अधिकाधिक आर्थिक फायदा मिळविण्यासाठीही त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. हॉकी इंडियास विरोधक असतातच, मात्र टीकाकारांकडे दुर्लक्ष केले की आपोआपच त्यांचा विरोध मावळतो असे धोरण बात्रा यांनी वापरले आहे. भारतीय खेळाडूंना परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी देण्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणली. केवळ पुरुष खेळाडू नव्हे तर महिला खेळाडूंनाही परदेशातील स्पर्धा व सराव शिबिरात भाग घेण्याची त्यांनी संधी दिली आहे. त्यामुळेच की काय रिओ येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ पात्र ठरला होता. तब्बल ३२ वर्षांनी भारतीय महिलांना ही संधी मिळाली. दुसऱ्या फळीतील खेळाडूंनाही परदेशातील स्पर्धामध्ये भरपूर संधी त्यांनी मिळवून दिली. बात्रा यांची हॉकी इंडियात एकाधिकारशाही आहे, अशी टीका त्यांच्यावर होत असते. मात्र काही वेळा एखाद्या खेळास ऊर्जितावस्था आणण्यासाठी व राष्ट्रीय स्तरावर त्या खेळास शिस्त लागण्यासाठी अशी मर्यादित हुकूमशाही आवश्यकच, हे बात्रा यांनी दाखवून दिले.

बात्रा यांच्या निवडीमुळे भविष्यकाळात हॉकीसाठी अनेक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम आयोजित करण्याची संधी भारतास मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच हॉकी इंडियाने ‘फाइव्ह अ साइड’ स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती. या स्पर्धेप्रमाणेच जागतिक स्तरावरही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न होणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिसच्या वाढत्या लोकप्रियतेस आव्हान देण्यासाठी असे नवनवीन उपक्रम आवश्यकच आहेत.