05 April 2020

News Flash

कॅथरीन जॉन्सन

नासामधील संशोधन निबंधावर प्रथमच त्यांच्या रूपाने एका महिलेच्या नावाची नाममुद्रा उमटली.

कॅथरीन जॉन्सन

माणूस चंद्रावर पाठवण्याची ईर्षां ५० वर्षांपूर्वी धरणाऱ्या ‘नासा’मध्ये, त्या काळात वर्णभेद होताच. त्यामुळे जे काही मोजके कृष्णवर्णीय तेथे काम करीत त्यांच्याप्रमाणेच तिला कुठल्याही वैज्ञानिक बैठकांना उपस्थित राहण्याचा अधिकार नव्हता, जेवणही वेगळे बसून घ्यावे लागत होते, महिला म्हणून इतर भेदाभेद होते ते निराळेच. लढा देऊनच अखेर ती दारे खुली झाली. या आफ्रिकन-अमेरिकी अभियंता महिलेचे नाव कॅथरीन जॉन्सन. अमेरिकेच्या अपोलो मोहिमा यशस्वी करण्यात ज्या महिलांचा वाटा होता त्यापैकी एक. त्यांच्या निधनाने प्रखर बुद्धीचा ‘मानवी संगणक’ कायमचा थांबला आहे. अमेरिकेचे पहिले अवकाशवीर जॉन ग्लेन हे अवकाशात जायला निघाले तेव्हा सगळी पूर्वतयारी झाली होती, पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो यानाची कक्षा ठरवण्याचा. त्या काळच्या आयबीएम संगणकावर आकडेमोड सुरू असताना जॉन ग्लेन तेथे आले व म्हणाले : संगणकाचे जाऊ द्या, त्या मुलीला बोलवा, तिलाच विचारा आता नेमके काय करायचे. ती मुलगी म्हणजे कॅथरीन. अतिशय प्रतिभावान गणितज्ञ अशीच त्यांची ओळख होती. पश्चिम व्हर्जिनियात जन्मलेल्या कॅथरीन यांचे वडीलही गणितात हुशार होते. लहान असतानापासून त्यांना गणिताची व आकडेमोडीची आवड, रस्त्याने जातानाही कशाची तरी मोजदाद करीत जायचे अशी एक वेगळी सवय त्यांना होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी सगळे शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर अठराव्या वर्षी पदवीही घेतली. कॅथरीन यांनी सुरुवातीला शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली. नंतर नासा म्हणजे तेव्हाच्या एनएसीएमध्ये त्यांनी १९५३ मध्ये अभियंता म्हणून काम सुरू केले. नासामधील संशोधन निबंधावर प्रथमच त्यांच्या रूपाने एका महिलेच्या नावाची नाममुद्रा उमटली. कालांतराने कॅथरीन नासाच्या उड्डाण संशोधन विभागात काम करू लागल्या. तेथे त्यांच्या भूमितीच्या ज्ञानाने सर्वाना चकित केले.

अमेरिकेच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेचा मार्ग तर त्यांनी आखून दिला होताच, शिवाय अपोलो १३ मोहिमेत नासाच्या कक्षातील सर्व संगणक बंद पडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली असताना, अमेरिकेची अवकाश मोहीम कायमची आटोपल्यात जमा असताना कॅथरीन यांनी आकडेमोड करून सगळा प्रश्न सोडवला. नंतर संगणक सुरू झाले तेव्हा त्यांनी केलेली आकडेमोड तंतोतंत संगणकावर उमटली आणि सगळेच चक्रावले. लिंगभेद, वर्णभेद या सगळ्यांवर मात करून स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या आधारे अवकाश तंत्रज्ञानात नाव कमावणाऱ्या कॅथरीन या नेहमीच सर्वासाठी आदर्श असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 4:53 am

Web Title: nasa mathematician katherine johnson profile zws 70
Next Stories
1 जेन्स नेगार्ड नडसन
2 थिच क्वांग डो
3 काकासाहेब चितळे
Just Now!
X