News Flash

नवल अल सदावी

निव्वळ स्त्रीवादी म्हणणे ही त्यांच्या विशाल कार्यबाहुल्याची कदाचित अवहेलना ठरेल.

नवल अल सदावी

 

‘जगभर भटकंती केल्यानंतर एक गोष्ट लख्ख जाणवली. मुलींचे बालपण सर्वत्र सारखेच त्रासदायक असते. पितृसत्ताक, धार्मिक, भांडवली व्यवस्थांमध्ये परिस्थिती सारखीच. आम्ही सर्व जणी एकाच नावेतल्या प्रवासी…’ – इजिप्तमधील स्त्रीवादी कार्यकत्र्या नवल अल सदावी यांनी अगदी अलीकडे, म्हणजे तीन वर्षांपूर्वी ‘रॉयटर’ वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीसमोर हा उद्वेग व्यक्त केला होता. निव्वळ स्त्रीवादी म्हणणे ही त्यांच्या विशाल कार्यबाहुल्याची कदाचित अवहेलना ठरेल. त्या निधर्मीवादी होत्या, विज्ञानवादी होत्या, वैद्यक आणि मानसोपचारतज्ज्ञ होत्या. इजिप्तमधील एका गावात त्या जन्मल्या नि वाढल्या. धार्मिक परंपरेनुसार वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची सुंता करण्यात आली. पण त्यांच्या रूढीप्रिय वडिलांच्या हृदयात एक कोपरा आधुनिकतेचे थोडे भान असलेला होता. त्यामुळेच छोट्या नवलला ती दहावी झाल्यावर ‘सांगून आलेले स्थळ’ नाकारून त्यांनी तिच्या मनाप्रमाणे उच्च शिक्षणासाठी सिद्ध केले. कैरो विद्यापीठातून नवल अल सदावी यांनी वैद्यकशास्त्राची पदवी मिळवली. त्या शिक्षणातून पुढे केवळ मानवी शरीराची नव्हे, तर मानसिकतेची, धार्मिकतेची आणि संस्कृतीची चिकित्साही घडत गेली.

अरब आणि इस्लामी पार्श्वभूमी असल्यामुळेच, प्रतिगामी परिप्रेक्ष्यातील प्रतिक्रिया म्हणून आधुनिक शिक्षण मिळवल्यानंतर नवल यांच्यातील स्त्रीवाद जागृत झाला, असे विश्लेषण करणाऱ्या पाश्चात्त्यांसाठी ती सोईस्कर पळवाट ठरते. अरब देशांत पुरुषवादी पितृसत्ताकवाद अधिक ठळक असल्यामुळे आत्मसन्मान मिळवण्यासाठी कदाचित नवल यांच्यासारख्या महिलेला तुलनेने अधिक भिंती ओलांडाव्या लागल्या असे फार तर म्हणता येईल. पण त्यांनी मुलींप्रमाणेच मुलांच्या सुंतेविरोधातही आवाज उठवला होता. शिवाय प्रतिगामित्व सोडून भांडवलशाहीला जवळचे पुरोगामित्व मिरवले, तरी मुलींच्या आयुष्यात फार फरक पडत नाहीच, हेही नवल यांनी सोदाहरण, सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘विमेन अ‍ॅण्ड सेक्स’, ‘द हिडन फेस ऑफ ईव्ह’, ‘ए डॉटर ऑफ आयसिस’ अशा अनेक पुस्तकांमधून त्यांनी धर्मसत्ता, राजसत्ता अशा प्रस्थापित संस्थांविरोधात बंड पुकारले. अरब जगतातील महिलांची घुसमटलेली लैंगिकता, शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण यांचा परस्परसंबंध त्यांनी दाखवून दिला. त्यांचे लिखाण धार्मिक नेत्यांना आणि सरकारांना मान्य होण्यासारखे नव्हतेच. कधी तुरुंगवास, कधी अज्ञातवास भोगावा लागूनही नवल अल सदावी यांचे विचार आणि लेखन थांबले वा थिजले नाही. इजिप्तसारख्या तुलनेने उदारमतवादी अरब देशात राहात असल्यामुळे कदाचित त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाले नाही इतकेच. तुरुंगातही त्या सक्रिय असायच्या. ‘अरब विमेन्स सॉलिडॅरिटी असोसिएशन’ या संघटनेचा जन्म तुरुंगातलाच. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच कैरोतील तहरीर चौकात अरब उठावांपैकी महत्त्वाचा उठाव २०११ मध्ये झाला. त्या वेळी हजारो विद्यार्थी-निदर्शकांच्या हातात नवलबाईंचे ‘द फॉल ऑफ द इमाम’ हे पुस्तक बहुतेकदा दिसून यायचे. नवल यांच्या अथक प्रयत्नांमुळे इजिप्तमध्ये मुलींच्या सुंतेवर बंदी आहे. नवल अल सदावींचे नुकतेच निधन झाले. खरे तर मलाला युसुफझाईच्याही आधी त्यांना शांततेचे नोबेल मिळायला हवे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:05 am

Web Title: nawal al sadawi profile abn 97
Next Stories
1 विलास वाघ
2 लक्ष्मीप्रिया महापात्र
3 जी. व्ही. रामकृष्ण
Just Now!
X