इतिहासकारांना ज्या भारतीय सम्राटांनी कायम भुरळ घातली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे सम्राट अशोक. वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याची तुलना कधी नेपोलियनशी केली तर कधी अलेक्झांडरशी. इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या ‘अशोका इन एन्शन्ट इंडिया’ या बहुचर्चित पुस्तकाला यंदाचा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.

प्रा. नयनज्योत लाहिरी हे नाव इतिहासाच्या अभ्यासकांना नवे नाही. त्यांचा जन्म ३ मार्च १९६० रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट  त्यांनी मिळवली. १९८२ ते १९९३ या काळात त्या दिल्लीतील हिंदू कॉलेजात अधिव्याख्यात्या होत्या. तेथून मग त्या दिल्ली विद्यापीठात अगोदर प्रपाठक आणि नंतर प्राध्यापक बनल्या. सध्या त्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, भारतीय पुरातत्त्वशास्त्र आणि  जागतिक वारसा स्थळांचा त्यांचा विशेष व्यासंग असून या क्षेत्रातील त्यांच्या मतांची जागतिक स्तरावर दखल घेतली जाते. या विषयावरील अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले असून जगभरातील प्रतिष्ठित नियतकालिकांत ते प्रसिद्ध झाले आहेत. आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.

डॉ. लाहिरी यांच्या नावावर विपुल ग्रंथसंपदा आहे. फाइंडग फरगॉटन सिटीज : हाऊ द इण्डस सिव्हिलायझेशन वॉज डिस्कव्हर्ड, द डिक्लाइन अ‍ॅण्ड फॉल ऑफ द इण्डस सिव्हिलायझेशन या सिंधुसंस्कृतीबद्दलच्या, द आर्किऑलॉजी ऑफ इण्डियन रूट्स अ‍ॅण्ड रिसोर्स यूज यांसारख्या विद्यापीठीय पुस्तकांचा त्यात समावेश आहे. ‘फाइंिडग फरगॉटन सिटीज’ या पुस्तकात मोहेन्जोदारो आणि हडप्पा या दोन नगरांचा शोध लावणाऱ्या व्यक्तीच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल उल्लेख आहेत. या शोधांशी संबंधित व्यक्ती होत्या, जनरल अलेक्झांडर किनगहॅम, लॉर्ड जॉर्ज नथानियल कर्झन, जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी. या पुस्तकाची जगभरातील विद्वानांनी दखल घेतली होती.

सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला. पुरातत्त्वशास्त्रातील जाणकार असल्याने अनेक सरकारी उपक्रमांत त्या सहभागी झाल्या आहेत. बोधगयावरील त्यांचे संशोधनही महत्त्वाचे समजले जाते. पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने २०१३ मध्ये त्यांना ५५ लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते आणि आता अमेरिकन हिस्टरी सोसायटीनेही त्यांच्या पुस्तकाला मानाचा पुरस्कार देऊन या भारतीय महिला इतिहासकाराचा बहुमान केला आहे.