News Flash

नझीर अहमद वानी

वानी यांचे आयुष्य एखाद्या हिंदी सिनेमातील कथानकात शोभेल असेच होते

नझीर अहमद वानी

प्रजासत्ताक दिन जवळ आला की ‘पद्म’सारखे नागरी सन्मान तसेच पोलीस, सेना दलांत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्यांना शौर्यपदके जाहीर केली जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जात असल्याने ते अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचेही मानले जातात. युद्ध सुरू असताना अतुलनीय शौर्य व कर्तबगारी दाखवणारे अधिकारी वा जवानांना परमवीरचक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार दिला जातो, तर शांतता काळात हाच मान अशोकचक्राला आहे. यंदा लष्करातील लान्स नाईक नझीर अहमद वानी यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला असून शनिवारी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना तो प्रदान केला जाईल.

वानी यांचे आयुष्य एखाद्या हिंदी सिनेमातील कथानकात शोभेल असेच होते. काश्मीरमधील कुलगाम तालुक्यातील अश्मूजी या छोटय़ाशा गावाचे ते रहिवासी. शाळेत असताना भारतात राहून आपले काहीही भले होणार नाही, यासाठी काश्मीर फुटून पाकिस्तानातच गेले पाहिजे, असे विचार वानी यांच्यावर बिंबवले गेले. मग तरुणपणीच पिस्तूल ते एके ४७ त्यांच्या हातात आली. अब बस कश्मीर कि आजादी के लिए जीना है.. हेच ध्येय मानून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला. अनेकांना धडा शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली. तीन-चार वर्षे परिवारापासून दूर राहण्यात घालवली.

श्रीनगरमध्ये एकदा त्यांना त्याचा मित्र भेटला. बंदुकीने कोणताही प्रश्न सुटत नाही, लोकांना मारून काश्मीरला स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही हे त्यांना मित्राने समजावले. त्यांनाही आपली चूक उमगली. मग त्यांनी शरणागती पत्करली व उरलेले आयुष्य देशसेवेसाठीच व्यतीत करण्याचे ठरवले. हिंसाचाराचा मार्ग सोडून हा ‘माजी’ अतिरेकी सैन्य दलात दाखल झाला. ही घटना २००४ मधील. खूप कौतुक झाले तेव्हा नझीरचे. टेरिटोरियल आर्मीच्या १६२ बटालियनमध्ये ते भरती झाले. या दलातील जवानांना दहशतवादविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठीच नियुक्त केले जाते. स्थानिक लोकांमध्ये मिसळून दहशतवाद्यांची माहिती मिळवायची व वेळ येताच त्यांना जेरबंद करायचे वा त्यांचा खात्मा करायचा, हेच यांना शिकवले जाते. वानी यांनी १४ वर्षे हे काम केले. या काळात दोन वेळा त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आले. गेल्या वर्षी शोपियां येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात वानी हे शहीद झाले. सहा अतिरेकी या चकमकीत मारले गेले. ३८ व्या वर्षां आपले कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याने त्यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर करण्यात आले. ‘माजी’ अतिरेकी ते अशोकचक्र.. हा वानी यांचा प्रवास सर्वाच्याच लक्षात राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 1:34 am

Web Title: nazir ahmad wani profiles
Next Stories
1 रसेल बेकर
2 विश्वेश्वर दत्त सकलानी
3 डी. गुकेश
Just Now!
X