07 December 2019

News Flash

नीला विखे पाटील

नीला विखे पाटील यांची स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांचे सल्लागार म्हणून नुकतीच निवड झाली.

नीला विखे पाटील

महाराष्ट्राच्या सुकन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांचे सल्लागार म्हणून नुकतीच निवड झाली. त्यांची निवड ही भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही महिन्यांपूर्वी स्वीडनला गेले होते. त्या वेळी तेथील पंतप्रधानांबरोबर  करार करण्यात आला होता. हरित तंत्रज्ञान, पारदर्शी कररचना व गुंतवणूक व स्टार्टअपकरिता या कराराला विशेष महत्त्व होते. हा करार व्हावा म्हणून नीला विखे यांनी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे या कराराचा मसुदाही त्यांनीच तयार केला होता. भारत व स्वीडन या दोन देशांमध्ये सौहार्दाचे वातावरण कायम टिकावे, मैत्री वाढीला लागावी, तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार याचबरोबर सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी म्हणून त्यांचा पुढाकार असतो. त्याचे कारणही तसेच आहे. राजकारण, सहकार, उच्चशिक्षण व सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या विखे कुटुंबातील त्या असून त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.  माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात तर शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. अशोक विखे यांच्या  कन्या आहेत.

नीला विखे यांचा जन्म हा स्वीडनमध्ये झाला असला तरी प्राथमिक शिक्षण त्यांनी काही काळ नगरमध्ये घेतले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी स्वीडन, स्पेन व युरोपात घेतले. त्यांना स्पॅनिश, स्वीडिश व इंग्लिश भाषा अवगत आहेत. गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र व कायद्याची पदवी त्यांनी मिळविली. माद्रिदमधील दी कम्प्ल्युटन्स विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण केले. त्यांना अनेक सुवर्णपदकेही मिळाली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. तीन वर्षांपूर्वीच त्या पंतप्रधानांच्या सल्लागार झाल्या होत्या. मात्र या वेळी त्यांच्यावर बांधकाम, अर्थ, अर्थसंकल्प, विपणन, समाजशास्त्र, वित्तीय बाजार, करप्रणाली, आदी जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. त्या स्टॉकहोम पालिकेवरही निवडून आल्या आहेत. आता त्यांची पंतप्रधानांचे पूर्णवेळ सल्लागार म्हणून निवड झालेली आहे.

नीला विखे यांना भारत खूप आवडतो. त्यांचे नातेवाईकही नगर जिल्हय़ात असल्याने त्यांचे जाणे-येणे नेहमी असते. सहा महिन्यांपूर्वी त्या नगर जिल्ह्य़ात आल्या होत्या. त्यांना भारताबद्दल विशेष अभिमान आहे. त्यांना पिठलं व भाकरी खूप आवडते. महाराष्ट्रीय पद्धतीचा स्वयंपाक त्यांना करता येतो.

१९८१ साली डॉ. अशोक विखे हे व्यावसायिक कारणाने स्वीडनला गेले होते. त्यांचे नागरिकत्वही स्वीडनचे आहे. डॉ. विखे हे जागतिक कृषी व आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्वीडन सरकारच्या आरोग्यविषयक समितीचे सल्लागार आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारलेल्या आहेत. सामाजिक कार्यातही ते आघाडीवर असतात. कुटुंबाचा वारसा त्यांनी पुढे नेला. त्याचा आता जगभर डंका वाजत आहे. नीला यांच्या या नियुक्तीबद्दल नगरच नव्हे तर राज्यभरातील तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

First Published on February 9, 2019 1:10 am

Web Title: neela vikhe patil profile
Just Now!
X