देशातील क्रीडा क्षेत्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच खेळाडू घडविण्याची मोठी जबाबदारी असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साइ) नीलम कपूर यांच्या रूपाने नव्या महासंचालक मिळाल्या. केंद्रीय मंत्रिमंडळा नियुक्तीविषयक बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. कपूर यांनी यूपीए सरकारच्या काळात केंद्र सरकारच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. १९८२च्या तुकडीतील भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असलेल्या कपूर याआधी क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयाच्या मुख्याधिकारी होत्या.

२००९च्या आधी कपूर ‘पीआयबी’च्या मुख्य महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. तेथे कार्यरत असताना कपूर या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाशी जोडलेल्या होत्या. एनडीएचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर क्षेत्रीय प्रसिद्धी संचालनालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. अशा प्रकारे प्रत्येक सरकारच्या काळात अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या नीलम कपूर यांची ‘साइ’च्या महासंचालकपदी निवड होणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. या पदावर निवड झालेल्या त्या भारतीय माहिती सेवेतील पहिल्याच अधिकारी आहेत. गतवर्षी नोव्हेंबर माहिन्यात त्यांच्यावर गृह आणि क्रीडा विभागाच्या प्रसाराचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. भ्रष्टाचार, उत्तेजके, क्रीडा सुविधांची वानवा, खेळाडूंचा आहार, प्रशिक्षणाचा अभाव अशा विविध क्रीडा क्षेत्रांतील नियमित समस्या सोडविण्याचे आव्हान कपूर यांच्यासमोर असेल. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) संपूर्ण देशातील खेळाडूंच्या विकासासाठी खुले करण्याचा प्रयत्न कपूर यांना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या विविध समस्या सोडविण्याबरोबरच शालेय पातळीपासून निर्माण होणाऱ्या समस्यांकडेही ‘साइ’ने लक्ष द्यावे, यासाठी त्या प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.  क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा इतरांचा निराशावादी दृष्टिकोन बदलणेही तितकेच आवश्यक आहे.  ईशान्य भारतात खेळाडू मोठय़ा प्रमाणावर असले तरी तेथे मिळणाऱ्या क्रीडा सुविधा तुटपुंज्या आहेत. वेगवेगळी सरकारे सत्तेत आली आणि गेली. मात्र, आजही क्रीडा क्षेत्र आणि खेळ तेथेच आहेत. भारतीय खेळाडूंचा ऑलिम्पिक पदकांचा आकडा वाढला असला तरी तो भारतीय क्रीडा क्षेत्रात तितका उत्साह निर्माण करणारा नाही. त्यासाठी पायाच भक्कम करण्याची गरज असून क्रीडा क्षेत्र कपूर यांच्याकडे त्याच आशेने पाहात आहे.