एका शाळेत शिक्षक, मग मुख्याध्यापक, पत्रकार आणि पुढे स्वत:च स्थापलेल्या वृत्तपत्राचे संपादक, पुढल्या काळात कुलगुरूसुद्धा..  अशी कामे करता करता ‘काही सांगायचे आहे.. लोकांपर्यंत जायचे आहे’ याची जाणीव त्यांनी जागी ठेवली आणि ते लिहीत गेले.. नेपाळी ही फार तर दीड-दोन कोटी लोकांची भाषा, त्या भाषेत त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत बाग फुलवण्यासाठी केवळ मेहनत नव्हे तर धाडस लागते, तसे साहित्यिक धाडस त्यांच्याकडे होते. त्यामुळेच, ‘माधवी’ या कादंबरीचे लेखक म्हणून मदनमणि दीक्षित यांची ओळख नेपाळबाहेरही झाली. हे मदनमणि दीक्षित वयाच्या ९६ व्या वर्षी, १५ ऑगस्टला काठमांडूतील रुग्णालयात निवर्तले.

‘माधवी’खेरीज ‘मेरी नीलिमा’, ‘भूमिसूक्त’ या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या होत्या. त्याआधी त्यांचे ‘कासले जित्यो कासले हाऱ्यो’ हे चिंतनपर पुस्तकही नावाजले गेले होते. अमेरिकेच्या ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मधील नोंदीनुसार, त्यांची १६ पुस्तके त्या ग्रंथागारात आहेत. त्यांच्या एकंदर प्रकाशित पुस्तकांची संख्या आहे ४७!

‘माधवी’ ही त्यांची पहिली आणि नेपाळीत वाचकप्रिय असणारी कादंबरी. माधवी ही राजा ययाती याची मुलगी. कर्तव्य, शिष्यत्व आणि प्रेम यांची ही कथा आहे. अन्य कादंबऱ्यांतही पौराणिक पात्रांचा आधार असला, तरी कथानक अनेकदा दीक्षित यांनी स्वत: विणलेले असे.  अशा लोकप्रिय कादंबऱ्यांइतकेच खरे तर त्यांचे ललितेतर लेखनही महत्त्वाचे होते. १९६० साली रशियाच्या दौऱ्यावर नेपाळचे प्रतिनिधी म्हणून गेलेले दीक्षित, पुढे पोलंडमध्येही जाऊन आले. हिटलरी नरसंहारात वापरले गेलेले ‘गॅस चेम्बर’ पाहून अस्वस्थ झाले. नेपाळी भाषेत त्या संहाराची अप्रिय कहाणी त्यांनी लिहिली.

त्यांचे वाडवडील राजदरबारी होते, राजनैतिक पदांवरही होते, त्यामुळे घरात वाचनाचे वातावरण होतेच. शिवाय, संस्कृत शिक्षणावर या कुटुंबाचा विशेष भर होता. तरुणपणी बनारस हिंदू विश्वविद्यालयात येऊन शिकण्याची उसंत मदनमणि यांना मिळू शकली. ते हिंदीदेखील उत्तम बोलू शकत. लेखन मात्र त्यांनी मातृभाषेतूनच केले.

नेपाळमधील राजेशाहीचा काळ, त्यातील चढउतार आणि आता स्थैर्य येणार असे वाटत असतानाच राजघराण्यात झालेले हत्याकांड, त्यातून उसळी घेतलेली लोकशाही चळवळ आणि अखेर नेपाळने राजेशाही हिंदुराष्ट्रापासून धर्मनिरपेक्ष लोकशाहीकडे केलेली वाटचाल, या साऱ्याचे दीक्षित हे साक्षीदार. लोकशाहीचे स्वागत का करावे, हा प्रश्न पडलेल्या अनेक परंपरानिष्ठांपैकी एक. नेपाळमधील राजेशाही अस्तंगत झाल्यानंतरच्या काळात त्यांनी हिंदू धर्माविषयी माहिती देणारी पुस्तकेच नेपाळीत लिहिण्यावर लक्ष केंद्रित केले. अर्थात, त्यांची चिरंतन ओळख मात्र ‘नेपाळी कादंबरीकार’ अशीच राहील.