18 October 2019

News Flash

कुमार संगकारा

मैदानाबाहेरही एक सुसंस्कृत आणि विचारी क्रिकेटपटू अशी संगकाराची प्रतिमा आहे.

इंग्लंड ही क्रिकेटची पंढरी आणि सन १७८७मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेल्या मेरिलिबॉन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीचा दरारा क्रिकेटविश्वात अजूनही आहे. क्रिकेटच्या नियमांबाबत संशोधन व परीक्षण करणे आणि खिलाडूवृत्तीला अग्रस्थान देण्याविषयीचा आग्रह धरणे या दोन्ही जबाबदाऱ्या एमसीसी वर्षांनुवर्षे पार पाडत आले आहेत. लॉर्ड्स मैदानाची मालकीदेखील त्यांच्याचकडे आहे. या प्रतिष्ठित क्लबने आजवर १६८ अध्यक्ष पाहिले. यांत काही वेळा राजघराण्यातील व्यक्ती, सरदार, उमरावही येतात. हे सगळेच ब्रिटिश होते. ब्रिटिशेतर अध्यक्ष आजवर एमसीसीने पाहिला नव्हता. ही परिस्थिती यंदा पालटेल. कारण १ ऑक्टोबर २०१९पासून कुमार संगकारा हा श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज आणि कर्णधार एमसीसीचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारेल.

क्रिकेटचा खेळ इंग्लंडमध्ये उगम पावला असला, तरी प्रथम ऑस्ट्रेलिया आणि नंतर भारतीय उपखंडात त्याचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. संगकाराला एमसीसीचे अध्यक्षपद मिळणे ही या विस्ताराला मिळालेली पावतीच ठरते. संगकारा हा मातबर क्रिकेटपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १२४०० धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४२३४ धावा ही आकडेवारी संगकाराला उत्कृष्ट फलंदाज ठरवण्यासाठी पुरेशी ठरते. संगकारा यष्टिरक्षकही होता आणि यष्टींमागे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे २०२ आणि ५०१ बळी घेतले. याशिवाय त्याने श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली.

पण निव्वळ मैदानावर नव्हे, तर मैदानाबाहेरही एक सुसंस्कृत आणि विचारी क्रिकेटपटू अशी संगकाराची प्रतिमा आहे. त्याच्या जाणिवा आणि नेणिवा वैश्विक आहेत. २०११मध्ये एमसीसीमध्ये त्याने दिलेले व्याख्यान आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्या व्याख्यानात त्याने क्रिकेट या खेळाचे श्रीलंकेच्या दृष्टीने असलेले महत्त्व विशद केले होते. अंतर्गत यादवीच्या जखमा ओल्या असतानाच्या काळात संगकाराने मांडलेले विचार श्रीलंकेची परिस्थिती आकळणारे ठरलेच; पण संगकाराची वैचारिक उंचीही दर्शवणारे ठरले. ती उंची आणि उपजत स्पष्टवक्तेपणा संगकाराला नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर साह्यभूत ठरतील. त्याचे चाहते आणि मित्र जगभर आहेत. भारतातही त्याच्याविषयी नितांत आदर आहे. पण केवळ प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे विकतचा नेमस्तपणा संगकाराने कधीच स्वीकारला नाही. अनेक घडामोडी, व्यक्तींविषयी त्याने परखडपणे विधाने केलेली आहेत. एमसीसीचा अध्यक्ष या नात्याने केवळ क्रिकेट नियमांविषयीच बोलण्याची चौकट तो स्वीकारेल अशी शक्यता नाही. क्रिकेट हा खेळ जगभर लोकप्रिय असला, तरी या खेळातील अपप्रवृत्तीही विस्तारत आहेत. आयपीएलसारख्या धंदेवाईक लीगमुळे पैसा खुळखुळत आहे. या निसरडय़ा संक्रमणकालात क्रिकेटमधील अभिजातता आणि निकोपपणा टिकवून ठेवणे आजही तितकेच गरजेचे आहे. क्रिकेटचे संचालन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी करते. मात्र या खेळातील नियमांचे आणि दर्जाचे ‘लेखापरीक्षण’ एमसीसी करते. म्हणूनच त्यांना क्रिकेट नियमांचे राखणदार असे म्हटले जाते. या राखणदारांचे नेतृत्व संगकाराकडे येणार असल्यामुळे एमसीसीची प्रतिमा उंचावली आहे.

First Published on May 3, 2019 2:17 am

Web Title: new mcc president kumar sangakkara profile