मानवी शरीरातील रोगांचे निदान करण्यासाठी क्ष किरणांचा वापर सुरुवातीला जेवढा प्रभावी ठरला तसाच नंतरच्या काळात एमआरआयचा वापरही शरीराचा वेध घेण्यात उपयोगी आला. ही क्रांती लेसरमुळे घडून आणली त्याच्या शिल्पकारांपैकी एक असलेले निकोलस ब्लूमबर्गेन यांचे नुकतेच निधन झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेदरलँड्समध्ये नाझींपासून लपून राहत तेलाच्या दिव्यावर त्यांनी पुंज यांत्रिकीचे शिक्षण घेतले. लेसर वर्णपंक्तीशास्त्रासाठी त्यांना नोबेलही मिळाले होते.

ते जन्माने डच असले तरी अमेरिकी नागरिक होते. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी ४० वर्षे संशोधन केले. अरेषीय प्रकाशशास्त्रातील ते तज्ज्ञ होते. विद्युतचुंबकीय लहरी द्रव्याशी कशी अभिक्रिया करतात यावर त्यांचे संशोधन होते. १९६० पर्यंत लोकांना साधे दिवे व इतर काही प्रकाशस्रोत माहिती होते, पण नवनिर्मित लेसर इतके शक्तिशाली होते की, ते ज्यातून जातील त्या पदार्थाचे गुणधर्म बदलत असत. जेव्हा लेसर किरण एखाद्या पदार्थावर पडतात तेव्हा प्रकाश शलाकेची सुसंगती तयार होते व तो अरेषीय प्रकाश परिणाम मानला जातो. ब्लूमबर्गेन यांना १९८१ मध्ये आर्थर शॉलो व काइ एम सिगबान यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते. लेसरचे पूर्वरूप असलेल्या मेसरच्या संदर्भात त्यांनी सोप्या पद्धती विकसित करून शेवटी लेसरच्या निर्मितीतही मोठे योगदान दिले होते. लेसरच्या शोधाबरोबर जी वैज्ञानिक प्रगती झाली त्याचे ते सक्रिय साक्षीदार होते. लेसरचे आजच्या काळात केवळ शस्त्रक्रियेतच नव्हे तर उत्पादन क्षेत्र, रोगनिदान, पदार्थ गुणधर्मशोधन यात अनेक उपयोग आहेत. आण्विक चुंबकीय सस्पंदन वर्णपंक्तीशास्त्राच्या मदतीने त्यांनी अणुकेंद्रकातील क्षीण चुंबकीय क्षेत्र व रेणवीय रचना यांचे अस्तित्व शोधले होते. न्यूक्लियर मॅग्नेटिक रिलॅक्सेशन हा त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध होता. त्याचे नंतर पुस्तक झाले. निकोलास यांचा जन्म नेदरलँड्समध्ये झाला. शिक्षणासाठी त्यांना कठीण आव्हाने झेलावी लागली. वयाच्या बाराव्या वर्षी ते  सरकारी शाळेत शिकले. तेथे रसायनशास्त्र, गणित व लॅटिन भाषा याची गोडी त्यांना लागली पण आव्हानात्मक भौतिकशास्त्राने त्यांना खुणावले ते कायमचेच. उट्रेख्त विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्राचे धडे गिरवले. १९४० मध्ये त्यांचा पहिला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. हिटलरने नेदरलँड्सवर हल्ला केला तेव्हा त्याचा फटका डॉ. ब्लूमबर्गेन यांनाही बसला. ते ज्यू नव्हते तरी नाझींनी त्यांच्यावर संशय घेतला त्यातच त्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर उट्रेख्त विद्यापीठ नाझींनी बंद केले. त्या काळात लोकांची अन्नान दशा असताना निकोलस त्यातून वाचले. पोट भरण्यासाठी त्यांनी एकदा टय़ुलिपची फुले खाल्ली होती. मित्र देशांनी नेदरलँड्सला स्वातंत्र्य मिळवून दिले, पण ब्लूमबर्गेन नंतर अमेरिकेला गेले व हार्वर्डमध्ये त्यांनी काम सुरू केले. नंतर काही काळ मायदेशी आले. इंडोनेशियातील जपानी यमयातना छावणीत जन्मलेल्या हुबर्टा डेलियाना ब्रिंक हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नंतर ते पुन्हा हार्वर्डला गेले.  नॅशनल मेडल फॉर सायन्स हा पुरस्कार त्यांना अध्यक्ष फोर्ड यांच्या हस्ते मिळाला होता. नंतर ते अ‍ॅरिझोना विद्यापीठात  अभ्यागत प्राध्यापक होते. विज्ञानाबरोबरच अध्यापनावर त्यांची अढळ निष्ठा होती. त्यामुळेच अनेक विद्यार्थी त्यांचे चाहते होते. ज्या प्रयोगशाळेत सुरुवातीला त्यांनी काम केले तेथील नोबेल जिंकण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली. लेसर तंत्रासारख्या एका महत्त्वाच्या शाखेतील त्यांचे संशोधन आजच्या काळात पदोपदी आपल्या उपयोगास येणार आहे.