News Flash

नीरज चोप्रा

जयवीरचा तो मित्र म्हणजे शनिवारी भालाफेकीत जागतिक विक्रम करणारा नीरज चोप्रा.

नीरज चोप्रा

 

 

एक हरयाणवी मुलगा जयवीर रोज भालाफेकीच्या सरावाला जात असे. त्याचा एक मित्र होता, त्यालाही तो एके दिवशी म्हणाला, ‘‘तूही चल, भालाफेक शिकून घे, तुला आवडेल कदाचित. मग तो भालाफेक शिकू लागला, नंतर त्याला भालाफेकीची आवड निर्माण झाली व चार वर्षे सरावानंतर त्यात त्याला निपुणताही मिळाली. जयवीरचा तो मित्र म्हणजे शनिवारी भालाफेकीत जागतिक विक्रम करणारा नीरज चोप्रा.

नीरजने पोलंड येथे विशीच्या आतील तरुणांच्या भालाफेक स्पर्धेत जागतिक विक्रम करतानाच सुवर्णपदकही पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय अ‍ॅथलीट ठरला आहे. रिओ ऑलिम्पिकने त्याला हुलकावणी दिली असली तरी त्याचे यश भारतासारख्या क्रीडा क्षेत्रात मागे पडलेल्या देशासाठी मोलाचेच आहे. त्याने या स्पर्धेत ८६.४८ मीटर इतक्या लांब अंतराचा भालाफेकीतील विक्रम केला. यापूर्वी लाटव्हियाच्या झिगिसमंड सिममाइस याने ८४.६९ मीटर इतकी नोंद केली होती. दक्षिण आशियाई स्पर्धेतील त्याचाच ८२.२३ मीटरचा विक्रमही त्याने मोडला. कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्याची बरोबरी करण्यापेक्षा आपली कामगिरी सुधारत जाणे महत्त्वाचे असते, त्यावर त्याने लक्ष केंद्रित केले होते. जेव्हा भाला माझ्या हातातून सुटला तेव्हाच मी काही तरी ऐतिहासिक करतो आहे याची जाणीव होती, असे त्याने सांगितले. त्यातून त्याचा आत्मविश्वासच दिसतो. खरे तर या वर्षी नीरज भालाफेकीत जागतिक पातळीवर आतापर्यंत सर्व अ‍ॅथलीट्समध्ये आठवा होता. त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकॉट हा लंडनमधला २०१२ मधील सुवर्णपदक विजेता, तेव्हा त्याने भाला फेकला तो ८४.५८ मीटर. मात्र, नीरजने त्यापेक्षा मोठे अंतर कापले आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी ८३ मीटर अंतर कापणे आवश्यक असते पण ते नीरजला ११ जुलैपूर्वी जमले असते तर. हा आता जर तरचा प्रश्न आहे, कारण तसे झाले असते तर तो ऑलिम्पिकला पात्र ठरला असता. दक्षिण आशियाई स्पर्धेपासून त्याने ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केले, पण दुर्दैवाने नवी दिल्लीतील फेडरेशन कप स्पर्धेत तो जखमी झाला होता त्यामुळे त्याची कामगिरी नंतर थोडी खालावली होती. हरयाणातील पंचकुला येथे नीरजने भालाफेकीचे धडे गिरवले. तो कठोर परिश्रम करणारा आहे, असे त्याचे प्रशिक्षक कॅलवर्ट सांगतात. युरोपमध्ये त्याने तीनदा ७९ मीटरचा टप्पा ओलांडला होता. युरोपात पहिली स्पर्धा झाली तेव्हा तापमान होते ६ अंश सेल्सियस, तर दुसऱ्या स्पर्धेत १२ अंश सेल्सियस. भारतात तो जिथे सराव करतो तिथे तापमान असते ४५ अंश सेल्सियस. यावरून नीरजने युरोपातही किती जिद्दीने व प्रतिकूल परिस्थितीतही ही कामगिरी केली होती हे दिसते. त्याने गेल्या वर्षी आंतरविद्यापीठ स्पर्धेत ८१.०४ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक मिळवले होते व आता त्याच्या नावावर जागतिक विक्रम आहे. कुठल्याही भारतीय अ‍ॅथलीटचे एक स्वप्न असते जागतिक सुवर्णपदकाचे, ते त्याने साकारले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 3:22 am

Web Title: niraj chopra
Next Stories
1 हाशिम अन्सारी
2 गॅरी मार्शल
3 मोहंमद शाहीद
Just Now!
X