एखादी व्यक्ती मुळातच हुशार, प्रगल्भ, समंजस असते. अंगच्या कलागुणांचे त्यांनी सोने केले आणि लोकांनी त्यांची भरभरून प्रशंसा केली तरी त्यांचे जमिनीवरचे पाय काही सुटत नाहीत. मराठीतून हिंदीत गेलेल्या आणि व्यावसायिक चित्रपटांमधून दिग्दर्शक म्हणून आपली मोहोर उठवणाऱ्या अगदी मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक असलेला निशिकांत कामत हा अशा दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होता. त्यामुळे निशिकांतसारखा प्रतिभावंत दिग्दर्शक गेला याहीपेक्षा त्याच्यासारखा चांगला माणूस गेल्याचे दु:ख जसे अजय देवगण, इरफान खानची पत्नी सुतापा सिकं दर, आर. माधवनसारख्या हिंदीतील चित्रपटकर्मीनी व्यक्त केले, तितकाच सन्नाटा ‘निशी’च्या रुईया नाक्यावरच्या त्याला जवळून ओळखणाऱ्या असंख्य मित्रांच्या, पडद्यावरूनच त्याला अनुभवलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातही पसरला होता.

रुईया महाविद्यालयाचे ‘नाटय़वलय’ आणि तिथून सुरू झालेला निशिकांतचा प्रवास. याच परिसरात त्याचे सिनेमाशी धागे जुळले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने चित्रपटसृष्टीत प्रयत्न सुरू के ले आणि २००५ साली त्याने दिग्दर्शित केलेला ‘डोंबिवली फास्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत त्याच चित्रपटाचा तमिळ रिमेक प्रदर्शित झाला आणि लागोपाठ तिसऱ्या वर्षी त्याने दिग्दर्शित केलेला ‘मुंबई मेरी जान’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे सुरुवातीचे दोन्ही चित्रपट सामाजिक भाष्य करणारे होते. ‘डोंबिवली फास्ट’ हा घडय़ाळाच्या काटय़ावर जगणाऱ्या मध्यमवर्गीयांची वेगाने होत चाललेल्या राजकीय-सामाजिक बदलांमुळे होणारी घुसमट व्यक्त करणारा पहिला चित्रपट.  प्रेक्षकांची मने जिंकून, राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून या चित्रपटाने सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. अनेकदा हिंदीत व्यावसायिक यश मिळाले नाही तर एक-दोन चित्रपटांतच अनेकजण माघार घेतात. मात्र सिनेमाची भाषा उत्तम जाणणाऱ्या, दिग्दर्शक म्हणून तंत्रावर पकड असलेल्या निशिकांतने हा प्रवास मध्येच सोडला नाही. उलट ‘फोर्स’, ‘दृश्यम’, ‘रॉकी हॅण्डसम’, ‘मदारी’ अशा मोठमोठय़ा हिंदी चित्रपटांतून देमारपट, विनोदी-रहस्यमय चित्रपट असे शैलीदार प्रयोग करत तो पुढेच जात राहिला.

शब्दांतून बोलण्यापेक्षा दृश्यांतून उत्तम व्यक्त होणाऱ्या निशिकांत कामतच्या व्यक्तिमत्त्वातला गोडवा, सिनेमातंत्रावरची त्याची हुकमत आणि त्याहीपेक्षा जाणत्याचे मंदस्मित ओठावर खुलवत प्रत्येक आव्हानाला भिडणारा त्याचा चेहरा अनेकांच्या काळजात घर करून गेला आहे. त्याच्यासारख्या तरुण, प्रतिभावान दिग्दर्शकाचे अकाली जाणे म्हणूनच चटका लावणारे आहे.