ज्या काळात ‘जादूची सतरंजी’, ‘राक्षसांचे युद्ध’ अशांसारख्या पुस्तकांवरच लहान वयातील मुलांचे पोषण होत होते, त्या काळात गिरिजा कीर यांनी मात्र जाणीवपूर्वक बालसाहित्याकडे लक्ष दिले आणि बाल-कुमार वयातील मुलांचे बौद्धिक-भावनिक संगोपन करण्याचा प्रयत्न केला. पण तेवढय़ावरच त्या थांबल्या नाहीत. आपल्या लेखनाच्या सीमा विस्तारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि साहित्यातील विविध प्रकारांत सातत्याने लेखन केले. ललित लेखन, कथा, कादंबरी यांसारख्या आकृतिबंधात त्यांनी विपुल म्हणता येईल, एवढे लेखन केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक पटलावर त्यांची स्वतंत्र ओळख झाली आणि त्यांच्या वाचकांनीही त्यांना भरपूर साथ दिली. केवळ लोकप्रियतेच्या प्रवाहात वाहवून न जाता, स्वतंत्रपणे वेगळे विषय शोधून त्याबद्दल शक्य तेवढे संशोधनात्मक काम करून मगच ललित लेखन करण्याकडे त्यांचा ओढा होता. येरवडा तुरुंगातील कैद्यांवर संशोधन करून त्यांनी लिहिलेले ‘जन्मठेप’ हे पुस्तक त्यांच्या या वेगळेपणाची साक्ष आहे. साहित्याच्या प्रांतात लेखन करणाऱ्या महिलांचे स्थान पक्के करण्यात गिरिजाताईंच्या लेखन कारकीर्दीचा मोठा वाटा आहे. ह. ना. आपटे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर यांच्या पिढीनंतर आणि विभावरी शिरुरकर यांच्यासारख्या वेगळ्या धाटणीच्या लेखनाने निर्माण केलेल्या हलकल्लोळानंतरच्या काळात गिरिजा कीर, सुमती क्षेत्रमाडे, कुसुम अभ्यंकर यांच्यासारख्या स्त्री-लेखकांची एक नवी फळीच उभी राहिली. त्यातही गिरिजाताईंनी विषयांचे वैविध्य, वेगवेगळे साहित्य प्रकार यामुळे आपले आगळे स्थान निर्माण केले. केवळ लोकप्रियतेच्या मागे न लागता, मनातले आणि भावणारेच लेखन करणे हे त्यांनी आपले व्रत मानले. त्यामुळे प्रसिद्धीच्या वलयापेक्षा लेखन हीच त्यांनी आपली सीमा मानली. लेखन हाच ध्यास असलेल्या त्या काळातील अनेक लेखकांप्रमाणे गिरिजाताईंना वाचकांनी भरभरून दाद दिली. कुष्ठरोगी, आदिवासी यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याच्या त्यांच्या ऊर्मीतून त्यांचे लेखन फुलले. कादंबऱ्या, कथा, आत्मकथन, चिंतन, प्रवासवर्णन यांसारख्या सगळ्या प्रकारांमध्ये चौफेर मुशाफिरी केलेल्या गिरिजाताईंनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले. स्त्री-लेखकाचे कथाकथन ही त्या काळात वेगळी सामाजिक जाणीव निर्माण करणारी घटना होती. गिरिजा कीर यांनी लक्षपूर्वक आपला हा गुणही जोपासला. ‘कुमारांच्या साहित्यकथा’, ‘गिरिजाताईंच्या गोष्टी’ या त्यांच्या बालसाहित्याला जसा उत्तम प्रतिसाद मिळाला, तसेच ‘चक्रवेध’, ‘चंद्रलिपी’, ‘चांदण्यांचं झाड’ यांसारख्या कादंबऱ्याही वाचकप्रिय ठरल्या. त्यांच्या लेखनातील एक वेगळा पैलू म्हणजे त्यांनी संतसाहित्याकडेही वाचकांचे लक्ष वेधले. ‘संत गाडगेबाबांचे चरित्र’ आणि ‘२६ वर्षांनंतर’ हे त्यांचे आध्यात्मिक लेखनही प्रसिद्ध आहे. ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार ही त्यांच्या लेखनाला मिळालेली सार्वजनिक दाद होती. एका वेगळ्या वाटेने जाणाऱ्या स्त्रीलेखनाची वाट चोखाळणाऱ्या गिरिजा कीर यांचे निधन म्हणूनच क्लेशकारक आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!