24 November 2017

News Flash

व्यक्तिवेध : तरुण सन्याल

पण कवितेची वाट त्यांना उशीरा सापडली.

ऑनलाइन टीम | Updated: August 30, 2017 2:52 AM

तरुण सन्याल

बंगालमधील काही आणि आसामचा किंवा अगदी बांगलादेशचा एखादा पुरस्कार, एवढेच तरुण सन्याल यांनी आयुष्यभरात मिळवलेले मानसन्मान. राष्ट्रीय पातळीचा सन्मान एकही नाही. पण सन्यालही मानसन्मानांसाठी कधीच झुरले नाहीत. त्यांनी प्राध्यापकी केली, पण कवी म्हणून – आणि कवीइतक्याच कलंदरपणे- ते  ८५ वर्षे जगले.  सोमवारी त्यांच्या निधनाने पश्चिम बंगालमधील ‘डाव्या कवीं’च्या तेजोमंडलातील एक तारा निखळला, असे मानले जाते. पण त्यांची कविता केवळ प्रचारकी अर्थाने ‘डाव्या विचारां’ची नव्हती. ‘मला (स्वतपुरती) मुक्तीसुद्धा नकोच’ असा मानवमुक्तीचा ध्यास तिने घेतला होता.

बर्धमान या गावानजीक १९३२ सालचा त्यांचा जन्म. शालेय शिक्षण त्या ब्रिटिशकालीन ‘बरद्वान’मध्येच. तरुण सन्याल यांना शालेय वयात कवितेचे आकर्षण होते खरे, पण कवितेची वाट त्यांना उशीरा सापडली. गुरुदेव रवीन्द्रनाथांच्या कविताही अर्थातच वाचल्या. पण ‘आपले’ काय हे कळेना. वयाच्या बाराव्या ते पंधराव्या वर्षी देशासाठी काही करू पाहणारे मित्र त्यांना मिळाले, पण राजकीय दिशा स्पष्ट नव्हती. मात्र  सतराव्या वर्षी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे लिखाण त्यांनी वाचले आणि ‘भारतीय’ साम्यवादाचा ध्यास काय असतो हे त्यांना जाणवले. सत्तेत नसलेल्या कम्युनिस्टांशी थेट परिचय झाला. कवितेतून व्यक्त होता येऊ लागले. समर सेन, सुभाष मुखोपाध्याय, राम बसू आदी समविचारी कवी-मित्र त्यांना मिळत गेले. अशाच एक सहप्रवासी म्हणजे महाश्वेतादेवी. महाश्वेतादेवींनी स्वत: च्या कादंबरीलेखनास  निराळे वळण देणारा जो झारग्राम-अभ्यासदौरा केला, त्यात त्यांच्या बरोबरीने सन्याल हेही सहभागी होते.

भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ साली झालेल्या युद्धावेळी पूर्व पाकिस्तानातील काही बंगाली साहित्यिक उघडपणे युद्धविरोधी भूमिका घेताहेत, हे तरुण सन्याल यांनी पाहिले आणि ‘तिकडल्या’ कवींशी संपर्क साधण्याची धडपड सुरू झाली. भाषा आंदोलन १९७१ मध्ये भरात आले, तोवर तरुण यांची ही धडपडही फळास आली होती. बांगलादेश निर्मिती व्हावी, यासाठी पश्चिम बंगालातील लोकशक्तीला दिशा देणाऱ्यांमध्ये तरुण सन्यालही होते. पुढे बांगलादेशच्या सरकारनेही २०१२ साली ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश’ या किताबाने त्या वेळच्या वैचारिक नेतृत्वाचा गौरव केला. त्यांना प. बंगालचा ‘रबीन्द्र पुरस्कार’ही उशिराच (२००६) मिळाला. सत्ता कम्युनिस्टांची  असूनही तरुण सन्याल रस्त्यावरचा संघर्ष करीत राहिले. आदिवासी, दलित यांच्या व्यथा निबंधांतूनही मांडत राहिले. ‘स्कॉटिश चर्च कॉलेजा’त अर्थशास्त्र शिकवत राहिले. कम्युनिस्ट सरकारविरोधात ‘सिंगूरचा लढा’ उभा राहिला, तेव्हा तरुण सन्यालही अग्रभागी होते. पुढे ममता बॅनर्जी सत्ताधीश झाल्यावर, त्यांच्या मनमानीला साथ न देणाऱ्या बुद्धिजीवींमध्येही तरुण सन्याल आघाडीवर होते. इतके की, शालेय इतिहासाच्या पुस्तकात सिंगूर-संघर्षांचा धडा समाविष्ट करण्यात आला, तो तरुण सन्याल यांचा उल्लेख वगळूनच.

वरवर पाहाता अनेक कप्प्यांमधले भासणारे हे आयुष्य, कवितेच्या सूत्रानेच सांधलेले होते. ‘‘हे तर सारे शब्दखेळ.. मी चालत राहातो आहे उन्हातान्हात, पावसापाण्यात.. तो माझे हे खेळ कुणाच्या हाती सोपवण्यासाठी?’’ याचे उत्तर त्यांना अंतर्यामी माहीत होते.. त्यांची सारी धडपड वंचितांसाठी होती.

First Published on August 30, 2017 1:52 am

Web Title: noted poet educationist tarun sanyal special article