‘वंचित विकास’ आणि ‘जाणीव’ या संस्थांचे संस्थापक ही विलास चाफेकर यांची समाजातील ओळख; पण वंचितांसाठी आजन्म कार्यरत राहिलेला निरलस, निरपेक्ष समाजसेवक ही त्यांची खरी ओळख होती. ते स्वत:च एक संस्था होते. आर्थिक, सामाजिक विषमतेमुळे वंचित राहिलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी झटण्याची जिद्द चाफेकर यांनी ऐन तारुण्यातच दाखवली आणि या जिद्दीचे रूपांतर पुढे एका अस्सल सामाजिक कार्यकर्त्यांत झाले. चाफेकर मूळचे ठाण्याचे. मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदकासह त्यांनी एमएची पदवी प्राप्त केली होती. उच्चशिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रत्यक्ष सुरुवात १९८२ मध्ये ‘जाणीव’ संघटनेच्या स्थापनेतून झाली. नंतर १९८५ मध्ये त्यांनी ‘वंचित विकास’ची स्थापना केली. वेश्याव्यवसायात नाइलाजाने आलेल्या महिलांचे व त्यांच्या मुलांचे प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिले आहेत. त्यातूनच ‘वंचित विकास’ने या प्रश्नावर काम सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून समाजाने नाकारलेल्या निरागस आणि अस्तित्वहीन मुलांसाठी त्यांनी ‘नीहार’ हे केंद्रही सुरू केले. चाफेकर यांनी वैयक्तिक प्रपंच मांडला नाही, पण समाजाची, भवतालाची आणि मुख्य म्हणजे वंचितांची काळजी वाहणे हीच त्यांच्या जीवनाची धारणा होती. त्यांच्या या कामांशी पुढे अनेकजण जोडले गेले आणि या दोन्ही संस्थांतून वेश्या वस्तीतील मुले, हातगाडी व्यावसायिक, कष्टकरी, आदिवासी, महिला आदींसाठी लक्षणीय कार्य उभे राहिले. हे काम करत असताना त्यांच्यातील उत्तम माणूस, तळमळीचा कार्यकर्ता व शिक्षक ही रूपे समाजाने अनुभवली. त्यामुळेच ते सर्वासाठी ‘चाफेकर सर’ झाले. त्यांनी सुरू केलेल्या कामाचा आता शब्दश: वटवृक्ष झाला आहे. चाफेकर यांच्या कार्याची समाजानेही वेळोवेळी दखल घेतली. समाजशिल्पी पुरस्कार (मुंबई), मंथन प्रतिष्ठान (पुणे), पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समाजभूषण पुरस्कार, शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टचा सेवा पुरस्कार, सार्वजनिक काका पुरस्कार, मुंबईच्या लोकमान्य सेवा संघाचा समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, आदी अनेक संस्थांनी चाफेकर यांच्या समाजसेवेचा बहुमान पुरस्कार प्रदानाने केला होता.

चाफेकर यांनी सुरू केलेल्या ‘वंचित विकास’ संस्थेच्या कार्याची दखल ‘लोकसत्ता’नेही घेतली होती. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात वंचित विकास संस्थेचा समावेश करण्यात आला होता आणि त्यांच्या सामाजिक कार्याप्रति त्या उपक्रमातून आदर व्यक्त करण्यात आला होता. चाफेकरांचे सामाजिक विषयांवरील भाष्य नेहमीच सुस्पष्ट आणि परखड असायचे. त्यांच्या जाण्यामुळे वंचितांचा सच्चा पाठीराखा हरपला आहे.