‘‘खरे तर मला हा पुरस्कार स्वीकारताना संकोचल्यासारखे होत आहे. इराक व सीरियात जी परिस्थिती आहे ती फार भयानक आहे, तरीही तिथे ज्वाळांना जवळ करीत आपण छायाचित्र पत्रकारिता केली. हजारो लोकांनी तेथून स्थलांतर केले आहे’’.. यंदाचा प्रिन्स क्लॉस पुरस्कार मिळालेली इराणची छायाचित्र पत्रकार न्यूशा तवाकोलिन हिचे हे उद्गार दहशतवादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरचे जळजळीत भाष्य आहे. तिला मिळालेला हा पुरस्कार १ लाख युरोचा आहे, पण तिने यातील १५ हजार युरो सीरियन व इराकी स्थलांतरितांच्या मदतीसाठी एका संघटनेला देण्याचे जाहीर केले आहे, १० हजार डॉलर महक फाऊंडेशनला, १३ हजार युरो शीन पुरस्कारासाठी देण्याचे जाहीर केले आहे.

न्यूशा ही स्वशिक्षित छायाचित्रकार आहे. तिने छायाचित्र पत्रकारिता व कला यांचा सुरेख संगम मध्यपूर्वेतील लोकांचे अनुभव चित्रबद्ध करताना साधला आहे. तिची काही छायाचित्रे बोलकी आहेत. र्निबधांचा व्यक्तिगत परिणाम, कुर्दीश लढाऊ महिला, मध्यमवर्गाची असुरक्षितता, जिहादी महिलेची उत्तर इराकमध्ये इसिसशी झुंज हे विषय तिने छायाचित्रांतून मांडले. २०१४ मध्ये तर तिने कार्मिगनॅक गेशन छायाचित्र पुरस्कार परत केला होता. कलास्वातंत्र्यावर तिचा फ्रेंच फाऊंडेशनशी वाद झाला. पन्नास हजार युरोचा हा पुरस्कार नंतर बरीच समजूत काढल्यानंतर तिने स्वीकारला. तिची छायाचित्रे ‘टाइम’, ‘नॅशनल जिऑग्राफिक व मॅग्नम फोटोज’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘ल फिगारो’, ‘ल माँद’ यांनी प्रसिद्ध केली आहेत. न्यूशाचा जन्म १९८१ मध्ये तेहरानमध्ये झाला. तिने छायाचित्र पत्रकारितेतून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने छायाचित्र कलेचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम केला होता व नंतर इराणी वृत्तपत्रात काम सुरू केले. तिने महिलांसाठी ‘झ्ॉन’ नावाचे वृत्तपत्रही काढले व नंतर नऊ सुधारणावादी वृत्तपत्रांत काम केले. आता या वृत्तपत्रांवर बंदी आहे. २००१ मध्ये न्यूयॉर्कच्या पोलॅरिस इमेजेसचे संस्थापक जे. पी. पॅपिस यांनी तिला फ्रान्समध्ये पेरपिग्नन छायाचित्र महोत्सवात संधी दिली. नंतर तिने पोलॅरिससाठी इराणमध्ये छायाचित्रण केले. अनेक युद्धे, नसíगक आपत्ती तिने टिपल्या. सामाजिक विषयावर वृत्तपट केले, त्यातून इराक, लेबनॉन, सीरिया, सौदी अरेबिया, पाकिस्तान व येमेनमधील हकीगत मांडली. ‘मदर ऑफ मर्टर्स’, ‘विमेन इन अ‍ॅक्सिस ऑफ एव्हिल’, ‘द डे आय बिकेम वुमन व लुक’ हे तिचे छायाचित्र संग्रह गाजले. तिचा जीवनातील साथीदार डच पत्रकार थॉमस एर्दिब्रक हा आहे. त्याची साथ तिला मोलाची वाटते.