टोक्योत १९१६ साली जन्म, ब्रिटिश पालकांच्या घटस्फोटानंतर आईसह अमेरिकेत, हॉलिवुडमध्ये दोन ‘ऑस्कर’ तसेच अमेरिका व फ्रान्सचे नागरी सन्मानही मिळवून १९५३ पासून पॅरिसच्या ब्वा द बूलाँग या शांत परिसरात वास्तव्य आणि तेथेच परवा, वयाच्या १०४ व्या वर्षी मृत्यू! तीन खंडांत आणि दोन शतकांत जगलेल्या ऑलिव्हिया द हॅविलँड यांची कहाणी अशी सनावळी आणि ठिकाणांच्या यादीत संपणारी नाही.. त्या कहाणीतला संघर्ष केवळ स्वत:च्या यश आणि प्रसिद्धीसाठीचा नाही.

भावदर्शी चेहरा, कमनीय बांधा, बोलण्याची गोड ढब वगैरे साचेबंद वैशिष्टय़ेच ज्या वेळी अभिनेत्रींकडून अपेक्षित असत, त्या वेळी ऑलिव्हिया यांना ‘गॉन विथ द विंड’(१९३९)  या जगभर तुफान गल्ला भरणाऱ्या आणि दहा ऑस्करनिशी अभिजात समजल्या जाणाऱ्या चित्रपटात भूमिका मिळाली- नायिकेची नव्हे.. सहनायिकेचीच. तीही, नायिका आणि आपण यांच्या डोळय़ांसमोरचा पुरुष एकच आहे, हे लक्षात आलेल्या सहनायिकेची. या भूमिकेत जे अभिनयकौशल्य ऑलिव्हिया यांनी दाखविले, त्यातून त्यांना नायिकेच्या भूमिकाही सहज मिळाल्या. पण त्या साऱ्या भूमिका, आधीच वठवलेल्या सहनायिकेपेक्षा काय निराळय़ा आहेत असा प्रश्न ऑलिव्हिया यांना पडला आणि काही भूमिका तर त्यांनी नाकारल्यासुद्धा! तो काळ स्टुडिओंना बांधल्या गेलेल्या कलावंत आणि तंत्रज्ञांचा. ‘वॉर्नर ब्रदर्स’सारख्या नामांकित स्टुडिओशी ऑलिव्हियांचे कंत्राट. पण भूमिका नाकारल्याने त्यांना काही काळ ‘निलंबित’ व्हावे लागले. या निलंबनकाळाची भरपाई म्हणून कंत्राट संपल्यावरही सहा महिने आमच्याचकडे काम कर, हा आदेश न पटल्याने ऑलिव्हिया यांनी रीतसर खटला गुदरला. तो त्या अखेपर्यंत लढल्या आणि जिंकल्या! कंत्राट-कायद्याचा एक मापदंड त्यांच्या या कामगिरीमुळे स्थापित झाला. अभिनयाचे ‘ऑस्कर’ त्यांना मिळाले, ते यानंतरच्या ‘टु ईच हिज ओन’ (१९४६) आणि ‘ द हेअरेस’ (१९४९) या चित्रपटांतील प्रमुख भूमिकांसाठी.  याखेरीज उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी दोनदा, तर उत्कृष्ट (प्रमुख) अभिनेत्री म्हणून एकदा त्यांना नामांकन मिळाले होते.

पहिले नामांकन तर, ‘गॉन विथ द विंड’च्या पदार्पणातच होते. त्या चित्रपटात सहनायिका नायिकेशी ज्या भगिनीभावाने वागते, तो भगिनीभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्र, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातील बहीण ज्यो फाँतेन यांच्याशी टिकला नाही, याची खंत ऑलिव्हिया यांना होती. त्यांच्या ‘वॉर्नर’ खटल्यावर २०१७ साली मिनिसिरीज निघाली, त्यातील आपले चित्रण योग्य नसल्याबद्दल भरलेला खटला मात्र त्या हरल्या होत्या.