नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या पूर्णो संगमा यांना वयाच्या पन्नाशीतच लोकसभेचे अध्यक्षपद मिळाले, तेव्हाची राजकीय परिस्थिती खूपच नाजूक होती. आपल्या नम्र स्वभावाने आणि नियम पाळण्याच्या आग्रहाने त्यांनी ते काम अतिशय चोखपणे बजावले. सभागृहातील गोंधळ काबूत कसा ठेवावा, याचा एक वस्तुपाठच त्यांनी आपल्या कारकिर्दीत घालून दिला. विरोधी पक्षातील व्यक्तीची बिनविरोध निवड होण्याची ती संसदीय इतिहासातील पहिली घटना. ईशान्येकडील राज्यातून राजकारणात आलेल्या फार थोडय़ा राजकीय व्यक्तींना आयुष्यभरात असे भरभरून मिळाल्याचे पाहायला मिळते. पण संगमा यांनी अतिशय कष्टपूर्वक हे यश संपादन केले.
वयाच्या अकराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या संगमा यांनी नंतर पदवी संपादन करून राजकारणात प्रवेश केला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद मिळाल्यापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना काही अपवाद वगळता, सतत राजकीय जीवनात कार्यरत राहता आले. केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी सलग बारा वर्षे काम केले. केंद्रात कामगार खात्याचे मंत्री असतानाच्या काळात देशातील उद्योगांमधील संप आणि टाळेबंदी कमी व्हावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फार महत्त्वाचे ठरले. कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या आयुष्यात वादळे येतातच तशी ती संगमा यांच्याही आयुष्यात आली. शरद पवार आणि तारिक अन्वर यांच्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. सोनिया गांधी यांच्या विरोधातील त्या काळात घडलेल्या या महत्त्वाच्या घटनेत संगमा यांनी नेतृत्व केले. तरीही त्यांचे मन काही त्या पक्षात रमेना. महाराष्ट्रापलीकडे फारसे स्थान मिळवू न शकलेल्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरली. नंतर दोनच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश केला. परंतु राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांना पक्ष सोडणे भाग पडले. निवडणूक हरले तरीही संगमा यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती स्वीकारली नाही. त्यांनी स्वत:चा नॅशनल पीपल्स पार्टी हा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाच्या तिकिटावर ते २०१४ मध्ये लोकसभेवर पुन्हा निवडून आले. संगमा यांचे राजकीय आयुष्य घटनांनी, वाद-प्रवादांनी भरलेले राहिले, तरीही त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने ते अजातशत्रू राहिले. आपले काम पूर्ण ताकदीने शेवटापर्यंत नेणे आणि त्यासाठी वाटेल तेवढे श्रम करायची तयारी ठेवणे हा त्यांचा परिपाठ दुर्मीळ म्हणावा असा. राजकारणात कोणते पद मिळाले, यापेक्षा त्या पदावर राहून काय काम केले, याचा हिशेब अधिक महत्त्वाचा असतो. संगमा यांच्या आयुष्याचा हा हिशेब ‘अधिक’ जास्त आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका सालस आणि कष्टाळू नेत्यास देश मुकला आहे.