संगीत रंगभूमी ही महाराष्ट्राची देशाला दिलेली देणगी आहे. अण्णासाहेब किलरेस्कर यांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले आणि किलरेस्करी नाटकांची एक परंपराच निर्माण केली. चित्रपटांच्या आगमनानंतर ही संपन्न परंपरा हळूहळू संपत जात असतानाच तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न अनेकांनी केले. त्यामुळेच आजही संगीत नाटकाची परंपरा अंशाने का होईना टिकून राहिली आहे. नारायणराव बोडस हे या परंपरेचे गेल्या काही दशकांचे कर्तृत्ववान साक्षीदार. संगीतातील आद्य ग्वाल्हेर घराण्याचे पाईक. लक्ष्मणराव बोडस हे त्यांचे वडील आणि शंकरराव बोडस काका. या दोन्ही बोडसांनी विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापलेल्या गांधर्व महाविद्यालयाची पताका फडकवत ठेवण्याचे फार मोठे काम केले. पलुस्करांचे शिष्य असलेल्या लक्ष्मणरावांवर कराचीमध्ये गांधर्व महाविद्यालय स्थापन करून तेथे अभिजात संगीताचा प्रसार आणि प्रसार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. (त्या वेळी भारताचा भाग असलेल्या कराचीमध्ये सुरू झालेले हे महाविद्यालय आज अस्तित्वात नसले, तरीही त्याची पाटी मात्र अद्यापही तेथे टिकून आहे.) फाळणीनंतर लक्ष्मणरावांबरोबरच नारायणरावही मुंबईत आले. तोपर्यंत या भागात संगीत नाटकांच्या परंपरेने रसिकांना चांगलेच वेड लावलेले होते. नारायणरावांनाही त्याची भुरळ पडली. मुळात अभिजात संगीताची उत्तम तालीम लाभल्यामुळे आणि या नव्या कला प्रकाराकडे कुतूहलाने पाहात असतानाच, तेथे काही कामगिरी करून दाखवण्याची इच्छा असल्याने नारायणरावांनी थेट रंगभूमीवर पदार्पण केले आणि अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळखही निर्माण केली.

दाजी भाटवडेकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करताना, रंगभूमीचे उत्तम शिक्षणच मिळाल्याची भावना नारायणराव नेहमी व्यक्त करीत असत. त्यामुळे संस्कृत आणि मराठी संगीत नाटकांमध्ये भूमिका करून अभिनय कलेबरोबरच संगीत कलेलाही सतत तळपत ठेवण्यात त्यांना यश मिळाले. कुठे थांबायचे, याचे भान अनेकांकडे नसते; ते नारायणरावांकडे होते. त्यामुळे वयाच्या साठाव्या वर्षी रंगभूमीवरून निवृत्त होणे त्यांनी पसंत केले; परंतु अंगी असलेली संगीत कला मात्र त्यांना स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते. मुंबई विद्यापीठात १२ वर्षे संगीत अध्यापनाचे काम त्यांनी केले आणि त्यानंतर अखेपर्यंत वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी लोकप्रिय करण्यासाठी देशभर प्रवास करून त्यांनी मैफली गाजवल्या. उत्तम गायन आणि त्याला अभिनयाची जोड हे संगीत नाटकासाठी अत्यावश्यक असे गुण. ते नारायणरावांकडे होतेच; पण त्याबरोबरच घराणेदार गायकीची उत्तम तालीम लाभल्यामुळे अभिजात संगीताच्या दरबारातही त्यांना आपले गुण दाखवण्याची संधी मिळाली. वडील आणि काका हे दोघेही विष्णू दिगंबरांचे आवडते शिष्य. माहीत नसलेल्या प्रांतांमध्ये जाऊन गुरुजींच्या आज्ञेला शिरसावंद्य मानणाऱ्या या दोन्ही बंधूंनी संगीत विद्यालय स्थापन करून संगीताची अखंड सेवा केली. शंकरराव बोडस यांची कन्या म्हणजे वीणा सहस्रबुद्धे आणि पुत्र काशिनाथ हेही संगीताच्या प्रांतात आपले स्थान पक्के केलेले कलावंत. नारायणरावांचे पुत्र केदार हेही आघाडीचे कलावंत म्हणून ओळखले जाणारे. बोडस हे घराणे असे संगीतात चिंब भिजलेले. संगीत हाच ध्यास आणि तीच जगण्याची प्रेरणा. सतत स्वरचिंतनात मग्न राहणे आणि केवळ त्याचाच विचार करीत राहणे हा नारायणरावांचा धर्म त्यांनी अखेपर्यंत अतिशय प्रेमाने पाळला. वाशीच्या गांधर्व महाविद्यालयात विनामूल्य अध्यापन करणे, ही त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा होती. त्यांच्या निधनाने संगीतात आकंठ बुडालेल्या एका तपस्वी साधकाचा अंत झाला आहे.

Maharashtrachi Hasyajatra fame Prathamesh Shivalkar bought new car mahindra thar
“यासाठी केला होता अट्टाहास…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं मोठं स्वप्न झालं पूर्ण, म्हणाला…
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Sanjay Raut talk about Monopoly of mp and mla in Western Maharashtra in sangli
पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत
Sanjay raut on prakash ambedkar
वंचितने ठाकरे गटाबरोबरची युती तोडली, संजय राऊत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे…”