नवे वर्ष सुरू झाले की चित्रपटशौकिनांना वेध लागतात ते विविध पुरस्कारांचे. त्यातही ऑस्करची बातच न्यारी. ऑस्करचा सोहळा रंगण्यास अजून वेळ असला तरी तंत्रज्ञानातील ऑस्करची (टेक्निकल ऑस्कर) घोषणा मात्र करण्यात आली असून यात बाजी मारली आहे ती मूळ भारतीय असलेल्या अमेरिकेतील पराग हवालदार यांनी! अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड सायन्सेसतर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या ११ फेब्रुवारी रोजी हवालदार यांना तो प्रदान केला जाईल.

देशातच नव्हे तर जगभरात विविध क्षेत्रांत आयआयटीतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांचा दबदबा आहे. अभियांत्रिकीपासून ते अर्थ क्षेत्रापर्यंत आयआयटीयन्स आपल्या प्रतिभेने तळपत आहेत. त्यात आता सिनेसृष्टीचाही समावेश झाला असून हवालदार हे खरगपूर आयआयटीतून कॉम्प्युटर इंजिनीअर झाले आहेत. १९९१ मध्ये पदवीधर झाल्यानंतर काही तरी नावीन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅनिफोर्निया’मधील उच्चशिक्षणात त्यांना पुढील मार्ग सापडला. ‘सोनी पिक्चर्स इमेजवर्क्‍स’मध्ये रुजू झाले.  चित्रपट आणि खेळांमध्ये द्विमिती आणि त्रिमिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये यांचे मोठे योगदान आहे. त्रिमितिदर्शक किंवा हालचाल टिपणारे तसेच व्हिडीओ किंवा छायाचित्र प्रक्रिया असलेल्या खेळांमध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचे हे तंत्रज्ञान ‘स्पायडरमॅन’ मालिकेतील सर्व चित्रपटांमध्ये वापरण्यात आले आहे. याचबरोबर ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’, ‘मॉन्स्टर हाऊस’, ‘हॉटेल ट्रान्सिल्वानिया’ आदी चित्रपटांमध्ये वापरण्यात आले आहे.

मल्टिमीडिया तंत्रज्ञानामध्येही त्यांचा हातखंडा असून कहाणी निर्मिती, छायाचित्र, व्हिडीओ, ऑडिओ, ग्राफिक्स यांचा योग्य वापर करून कहाणी विकसित करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याचबरोबर सी++, सी, मॅटलॅब, जावा, पायथॉन, लिस्प आणि सीलोज या संगणकीय भाषांचेही ते तज्ज्ञ मानले जातात. माया, न्यूक, अडोब प्रीमियर, फोटोशॉप, अडोब आफ्टर इफेक्ट्स, थ्रीडी स्टुडिओ यामध्ये प्लगइन देण्याचे कामही हवालदार यांनी केले आहे. अनेकदा संगणकतज्ज्ञ कोणत्या तरी एका ऑपरेटिंग प्रणालीवर काम करत असतात. मात्र हवालदार हे विण्डोज आणि लिनक्स या दोन्ही ऑपरेटिंग प्रणालीतील तज्ज्ञ मानले जातात. या त्यांच्या  कामाची दखल घेऊनच त्यांना ‘ टेक्निकल ऑस्कर ’चा पुरस्कार देण्यात आला आहे.

ते आयआयटीत शिकत असताना अ‍ॅनिमेशनचे तंज्ञत्रान खूपच बाल्यावस्थेत होते. पुढे याच क्षेत्रात करिअर करायचे हे त्यांनी तेव्हाच ठरवले होते. गेल्या काही वर्षांत आयआयटीतून पदवी घेतलेल्या अनेक अभियंत्यांनी थक्क करणारे संशोधन विकसित केले आहे. विजेवर चालणारी रेसिंग कार, अंध व्यक्तींना चालताना अत्यंत उपयोगी पडणारी काठी, लष्करात वापरले जाणारे ड्रोन, दिल्लीतील वायूप्रदूषणावर मात करण्यासाठी शोधलेली हायड्रोजन ऑटो अशी एक ना अनेक तंत्रज्ञान आयआयटीयन्सनीच विकसित केली होती. त्यात आता हवालदार यांच्या या नव्या तंत्रज्ञानाचाी भर पडली असून त्यांच्या रूपाने देशातील आणखी एका अभियंत्याचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे.