‘रॉस्सीलाच ठाऊक तो कुठे खेळतो ते. आणि रॉस्सीलाच ठाऊक तो केव्हा खेळतो ते!’.. एका राष्ट्रीय प्रशिक्षकाने एखाद्या फुटबॉलपटूविषयी असे जाहीर उपहासात्मक विधान करणे म्हणजे त्या फुटबॉलपटूची कारकीर्द संपुष्टात आल्याचेच मानायला हवे ना? परंतु इटलीच्या पावलो रॉस्सीसंदर्भात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक एन्झो बेअरझोत यांनी असे अनेकदा म्हटले, तरी रॉस्सीला संघाबाहेर काढले नाही. पावलो रॉस्सी हा इटलीचा माजी फुटबॉलपटू परवा ६४व्या वर्षीच अचानक निवर्तला. पण विश्वचषक १९८२मधील कामगिरीतून तो जिवंतपणीच अमर झाला होता. १९८०मध्ये सामनेनिश्चिती प्रकरणी रॉस्सीवर इटालियन फुटबॉल संघटनेने तीन वर्षांची बंदी घातली होती. तो ‘स्ट्रायकर’ म्हणून खेळायचा आणि इटलीत चांगल्या, भरवशाच्या गोलमारकांची वानवा होती. प्रशिक्षक बेअरझोत यांनी दोन वर्षे वाट पाहिली, परंतु रॉस्सीच्या तोडीचा कोणी त्यांना गवसला नाही. अखेर त्यांच्याच विनंतीवरून रॉस्सीचा बंदीकाल घटवण्यात आला नि तो कसाबसा स्पेनमधील विश्वचषक १९८२ स्पर्धेसाठी उपलब्ध झाला. पण पहिल्या तीन सामन्यांमध्ये – वि. पोलंड, वि. पेरू आणि वि. कॅमेरून – इटलीला बरोबरीपलीकडे जाता आले नाही. त्यावेळी फुटबॉलवेडय़ा इटालियन जनतेने आणि माध्यमांनी ‘रॉस्सीत नक्की काय पाहिले’ असा पश्न विचारत इटालियन प्रशिक्षकांवर टीकेची झोड उठवली. त्यावेळी त्यांनी उपरोल्लेखित ते जगप्रसिद्ध उत्तर दिले. त्यांचा हा विश्वास म्हणजे बेजबाबदारपणा ठरू नये, याची काळजी रॉस्सीने घेतली. पुढील टप्प्यात इटलीचा सामना ब्राझीलविरुद्ध झाला, त्या सामन्यात रॉस्सीने चक्क हॅटट्रिक साधली. मग उपान्त्य फेरीत पुन्हा पोलंडविरुद्ध दोन गोल आणि अंतिम सामन्यात (पश्चिम) जर्मनीविरुद्ध इटलीच्या तीनपैकी पहिला गोल. एकूण सहा गोल. कुठे खेळायचे आणि कधी खेळायचे याचा यापेक्षा उत्तम आविष्कार थोडक्यांनीच सादर केला असेल. १९८२मध्ये रॉस्सीने इटलीच्या जगज्जेतेपदाबरोबरच गोल्डन बॉल (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू), गोल्डन बूट (स्पर्धेत सर्वाधिक गोल), त्यावर्षीचा ‘बालें डिओर’ असे एकूण पाच पुरस्कार जिंकले. ही किमया साधणारा तो एकमेव. पेले, मॅराडोना, बेकेनबाउर, क्रायुफ, प्लॅटिनी, झिदान, मेसी, दोन्ही रोनाल्डो यांची उंची त्याने गाठली नाही. महानपणासाठी लागणारे सातत्य त्याच्यात नव्हते. त्या निकषावर तो असामान्य नसेलही, पण एक उत्कृष्ट स्ट्रायकर होता. कधीही विश्वचषक न जिंकू शकणाऱ्या महान संघांमध्ये ब्राझीलच्या १९८२मधील संघाची गणना होते. हे काहीसे उत्तेजनार्थ बिरूद त्यांच्या वाटय़ाला आले ते निव्वळ रॉस्सीमुळे. त्या कामगिरीनंतर जशी इटालियन फुटबॉलची दिशा बदलली, तसेच ब्राझिलियन फुटबॉलचेही युरोपीकरण सुरू झाले. हे दोन युगप्रवर्तक बदल घडवून आणण्यासाठी एखाद्या फुटबॉलपटूने त्याच्या पसंतीचा क्षण निवडला, तर बिघडले कुठे?