18 July 2019

News Flash

यानिस बेरहाकिस

सगी संस्थेतून छायाचित्रकलेचे धडे घेतले. त्यांना छायाचित्रकार व्हायचे होते व श्रेयस-प्रेयस एक झाले.

एक छायाचित्र हजारो शब्दांच्या लेखापेक्षाही बरेच काही सांगून जाते. ग्रीसचे वृत्त छायाचित्रकार यानिस बेरहाकिस यांची छायाचित्रे ही त्याही पलीकडची होती. आजच्या काळात वृत्तपत्र छायाचित्रात अशी चमक अभावानेच दिसते. बेरहाकिस यांनी त्यांच्या तीस वर्षांच्या कारकीर्दीत अफगाणिस्तान, चेचन्यामधील संघर्ष, इजिप्तमधील उठाव, काश्मीरमधील मोठा भूकंप असे अनेक विषय त्यांच्या कॅमेऱ्यातून टिपले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्र छायाचित्रकारांची एक प्रेरणाच गळून पडली आहे.

१९८३ मध्ये ‘अंडर फायर’ या चित्रपटात वार्ताहरांचा एक गट निकाराग्वात काम करीत असतो.  हा चित्रपट पाहून बेरकाहिस हे छायाचित्रकलेकडे वळले. २०१६ मध्ये निर्वासितांच्या युरोपातील पेचप्रसंगाचे जे छाया वार्ताकन त्यांनी केले त्यासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांची छायाचित्रे ही कलात्मक तर होतीच, पण जीवनाचा अर्थ नकळत उलगडत जाणारी होती. चांगले छायाचित्र मिळवण्यासाठी त्यांनी अनेकदा जीव धोक्यात घातला. त्यांची काही छायाचित्रे ही कलेचा एक उत्तम नमुना आहेत. १९८७ मध्ये रॉयटर्स वृत्तसंस्थेत त्यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणून काम केले. जानेवारी १९८९ मध्ये त्यांना लिबियात पाठवण्यात आले. पत्रकारांना सामोरे जाण्यासाठी लिबियाचे नेते मुआम्मर गड्डाफी एका हॉटेलमध्ये आले होते त्या वेळी सगळ्यांची एकच धांदल उडाली त्यात बेरहाकिस होते. त्या वेळी त्यांनी विस्तारित कोनातून घेतलेली गडाफी यांची छायाचित्रे दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांत पहिल्या पानावर झळकली. तेथून नंतर त्यांचा प्रवास असा खडतरच झाला. युरोप, रशिया, मध्यपूर्व, आफ्रिका, आशिया या भागांतील संघर्षांच्या अनेक कहाण्या त्यांच्या छायाचित्रांनी जिवंत केल्या. ते झूम पद्धतीने व उंचावरून छायाचित्रे काढत त्यामुळे त्याला एक वेगळा पैलू मिळत असे. सिएरा लोनमध्ये ते नागरी संघर्षांचे वार्ताकन करीत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला  झाला, त्यात त्यांचा एक सहकारी व ते वाचले. शेवटच्या काळात ते ग्रीसमध्ये होते. तेथील आर्थिक पेचप्रसंगाचे छायाचित्रांकन त्यांनी केले. नंतर त्यांना कर्करोगही झाला. कुठल्याही शोकांतिकेत सापडलेल्या लोकांकडे लाचार म्हणून पाहू नका, त्यांनाही अस्मिता असते हेच त्यांच्या छायाचित्रातून त्यांनी सांगितले. अथेन्समध्ये जन्मलेल्या बेरहाकिस यांनी खासगी संस्थेतून छायाचित्रकलेचे धडे घेतले. त्यांना छायाचित्रकार व्हायचे होते व श्रेयस-प्रेयस एक झाले. वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार, बॅयेक्स काल्व्हाडोस पुरस्कार, गार्डियनचा फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार (२०१५) असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

First Published on March 7, 2019 12:56 am

Web Title: photographer yannis behrakis profile