News Flash

पिनरायि विजयन

विजयन हे केरळचे मुख्यमंत्री होण्यास अच्युतानंदन यांनी पाठिंबा दिला.

‘केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात ज्येष्ठ नेते आणि भूतपूर्व मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचा गट, तसेच पक्षाचे माजी राज्य सरचिटणीस पिनरायि विजयन यांचा ‘विजयन गट’ हे दोन गट असून ते एकमेकांना कधीही वर येऊ देणार नाहीत,’ हे प्रसारमाध्यमांनी रंगवलेले चित्र गेल्या शुक्रवारी पार फिके पडले. विजयन हे केरळचे मुख्यमंत्री होण्यास अच्युतानंदन यांनी पाठिंबा दिला. मुळात, माकपचे केंद्रीय नेते सीताराम येचुरी यांनी या तटवर्ती राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक अच्युतानंदन यांची लोकप्रियता आणि विजयन यांचे संघटनकौशल्य या दोहोंचा मेळ घालूनच लढवली होती. दशकभरापूर्वी या दोन नेत्यांत खटके उडाले होते हे खरे, पण प्रसारमाध्यमांना ‘एक नायक आणि दुसरा खलनायक’ हे चित्र रंगवणे सोपे वाटते, तसे या दोघांनीही कधी होऊ दिलेले नाही.
विजयन हे ताडी गोळा करून जगणाऱ्या गरीब कुटुंबात १९४४ साली जन्मलेले, गरिबीतच वाढलेले आणि महाविद्यालयीन शिक्षणाआधी वर्षभर हातमागावर काम करून पैशाची तजवीज करावी लागलेले. तरुणपणीच, लोकांना संघटित करण्याचे त्यांचे कसब दिसून येऊ लागले. आपली विचारधारा इतरांपेक्षा निराळी कशी, आपल्याला कशाविरुद्ध लढायचे आहे आणि ही लढाई आज कुठल्या आयुधांनी लढली पाहिजे, याची जाण विजयन यांना महाविद्यालयातही इतरांपेक्षा अधिक असल्याने आधी ‘केरळ स्टुडंट्स फेडरेशन’ आणि पुढे ‘केरळ सोशालिस्ट यूथ फेडरेशन’चे ते नेते बनले. माकपच्या कण्णनूर (कण्णूर) जिल्हाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हा विजयन होते अवघ्या २४ वर्षांचे! त्या- १९६६ ते ७० या ‘नक्षलवादाने भारलेल्या’ काळातही, आपला मार्ग नक्षलवादाचा नाही, अशी मांडणी ते करीत होते. अठ्ठावीस वर्षांचे असताना, १९७० साली कुठुपरंबा विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा केरळ विधानसभेवर गेले. आणीबाणीत ‘मिसा’खाली कारावास भोगून पुन्हा १९७७ मध्ये, तसेच १९९१ मध्ये तेथूनच आमदार झाले. लोकलढय़ाची गरज कुठे आहे आणि एकदा आंदोलन ठरले की ते कसकसे यशस्वी करायचे, याच्या पाहणी-आखणीचे त्यांचे कसब सतत दिसत राहिले. १९९६ ते १९९८ या सार्वत्रिक खासगीकरणाच्या काळात, केरळच्या वाढीव वीजपुरवठय़ासाठी त्यांनी केलेल्या करारांमुळे राज्याचे नुकसान झाल्याचा ठपका राज्य लेखापरीक्षकांनी ठेवल्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांच्यावर झाला. अच्युतानंदन यांच्या मंत्रिमंडळातील पद त्यांनी सोडले. मात्र, या ‘लवलीन प्रकरणा’त भ्रष्टाचार नसल्याचे आढळून आले आणि विजयन यांना (सी. गोविंदन यांच्या निधनानंतर) पक्षाचे राज्य सरचिटणीसपद मिळाले. राज्य माकपमधील हे पद दीर्घकाळ सांभाळलेल्या ईएमएस नंबुद्रिपाद आणि अच्युतानंदन यांच्याप्रमाणेच, आता विजयनदेखील केरळचे मुख्यमंत्री होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2016 3:40 am

Web Title: pinarayi vijayan
Next Stories
1 रूपा अय्यर
2 दत्ता देसाई
3 आंद्रे ब्राहिक
Just Now!
X