News Flash

मीना कपूर

मीना कपूरचे वडील बिक्रम कपूर हे न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते.

मीना कपूर 

 

भारतीय चित्रपटाचा बोलपट झाला, असे म्हणण्यापेक्षा त्याचा स्वरपट झाला, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे, इतका चित्रपटाचा पडदा संगीताने व्यापून टाकला. पहिल्या चित्रपटापासून संगीताचा हा ‘सिलसिला’ सुरू झाला, तो आजवर सुरूच राहिला आहे. त्याचे कारण त्या संगीताला अतिशय प्रतिभावंतांचा स्पर्श झाला. संगीतकारांच्या बरोबरीने गायक कलावंतांनी या संगीतात योगदान दिले, म्हणूनच मीना कपूर नावाची पाश्र्वगायिका, निवृत्तीनंतर पन्नास वर्षांनंतरही लक्षात राहते. रसिकांना कदाचित तिचे नाव आठवणार नाही, पण तिने गायलेली गाणी सांगितली, की ही ओळख अधिक गहिरी होते. ‘आना मेरी जान संडे के संडे’, ‘कुछ और जमाना कहता है’, ‘रसिया रे मन बसिया रे’ ही गाणी म्हणजे मीना कपूरची सही असलेली गाणी. अतिशय सुंदर, नितळ, स्वच्छ आणि निकोप असा आवाज. सहजपणे वळणाऱ्या आवाजातून निघणाऱ्या हरकती आणि मुरकती यामुळे ही गाणी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली. मीना कपूरचे वडील बिक्रम कपूर हे न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी. सी. बरुआ हे नातेवाईक. घरातच चित्रपट असल्याने मीना कपूरला चित्रपटात प्रवेश सुकर झाला; पण ती लोकप्रिय मात्र तिच्या गुणांमुळेच झाली. कुणाची मुलगी वा मुलगा म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणे एक वेळ सोपे असते, पण तिथे आपली ओळख निर्माण करण्यासाठी मात्र प्रचंड मेहनत आणि कष्टाची तयारी असावी लागते. मीना कपूर यांनी चित्रपटसृष्टीत जवळपास पंचवीस वर्षे आपली ओळख त्याच गुणांवर टिकवून ठेवली. तरुण वयातच एस. डी. बर्मन यांच्यासारख्या संगीतकाराने तिला हेरले आणि तिला ‘अथ दिन’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आणले. समकालीन असलेल्या गीता दत्त यांच्याशी त्यांचे मैत्र स्पर्धेच्या पलीकडचे राहिले, याचेही कारण त्या दोघींमध्ये असलेली गुणग्राहकता हेच. १९४० ते ६५ हा मीना कपूर यांच्या कारकीर्दीतील बहराचा काळ.

संगीतकार अनिल विश्वास हेही भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय आदराने घेतले जाणारे नाव. मीना कपूर यांचा त्यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला. त्या काळातील चित्रपटसृष्टीला अनिल विश्वासही कंटाळले होते. त्यामुळे आकाशवाणीवर काम करण्याची चालून आलेली संधी त्यांनी स्वीकारली. मीना कपूर यांनीही आपल्या कारकीर्दीला रामराम करून त्यांच्याबरोबर दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तरीही नंतरच्या काळात त्या चित्रपटांसाठी गातच राहिल्या. चित्रपट संगीतात भाव व्यक्त करण्याची क्षमता फारच महत्त्वाची असते. गीता दत्त, सुरैया, मीना कपूर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचे महत्त्व त्याचसाठी. या सगळ्यांनी भारतीय रसिकांचे कान तयार केले. त्यामुळे बेसूर आणि सुरीले, यातला फरक सामान्य रसिकालाही कळू लागला. संगीतकारांच्या रचनेला योग्य न्याय देणे म्हणजे केवळ त्याच्या चालीबरहुकूम गाणे नव्हे. त्यासाठी गायक कलावंताकडे स्वत:ची प्रतिभाही असावी लागते. त्यामुळेच भारतीय चित्रपट संगीत हा प्रतिभावंतांचा संगम होतो. संगीतकार, गायक आणि वादक या सगळ्यांच्या सर्जनाचा तो परिपाक होतो.

मीना कपूर यांनी हजारो गीते गायली नाहीत; पण तरीही त्यांची ओळख टिकून राहिली, याचे कारण प्रत्येक गीतात त्यांनी ओतलेला प्राण. गेल्या आठवडय़ात, २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या त्यांच्या निधनाने चित्रपट संगीताचा तो सारा काळ पुन्हा एकदा उजळून मात्र निघाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:01 am

Web Title: playback singer meena kapoor
Next Stories
1 शाहरोख हतामी
2 डॉ. लिली हॉर्निग
3 हबिबुल्लाह बादशा
Just Now!
X