कवी आरतीप्रभू, ग्रेस यांच्या कविकुळातले म्हणावेत असे कवी बालम केतकर यांची निधनवार्ता अलीकडेच आली अन् अर्थगर्भ गूढतेचे आकर्षण असणारा लिहिता कवी मराठी साहित्यविश्वाने गमावल्याची भावना व्यक्त झाली.  बालम केतकर हे मूळचे चित्रकार. त्यामुळे जीवनावकाशाची त्यांची जाण रेषांतून जशी व्यक्त झाली, तशीच ती शब्दांतूनही. त्यांची अभिव्यक्ती काहींना कवी ग्रेसांच्या कवितांप्रमाणे गूढगर्भ वाटे, मृत्यूभयाचे कंगोरे तपासणारी वाटे, काहीशी दुबरेधतेकडे झुकलेलीही वाटे. पण त्यातली अंगभूत लय त्यांच्या मुक्तछंदातल्या कवितांमधूनही जाणवणारी होती, हे नाकारता येणार नाही. अलीकडच्या काळातली कोरडी झालेली मराठी कविता पाहता, बालम केतकर यांची ओल जपणारी कविता सशक्तपणे उभी राहिली. वाचकाला तिच्या आशयाशी जोडले जाण्याचे आवाहन करत राहिली. त्यांचे ‘तळघरातील हंसध्वनी’, ‘चंद्र गंजलेला’ आणि अलीकडचा ‘विरक्त फुलपाखरे’ असे एकूण तीन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यातली त्यांची कविता वृत्तबद्ध आहे, तशीच छंदाचे प्रयोग करणारीही आहे. ही प्रयोगशीलता इतकी की, अगदी ‘हायकू’सारखा ‘कायकू’ हा नवा काव्यप्रकारही त्यांनी रचला होता. ‘काय’ असा प्रश्न त्यात अपेक्षित असतो असे त्यांचे त्यावरील स्पष्टीकरण होते. भाषेशी लडिवाळ खेळ  करत नियमोल्लंघन करणारी त्यांची कविता जणू खास ‘केतकरी शैली’ म्हणावी इतकी अनवट. पण स्वयंभूपणाचा शोध हे त्या शैलीदार कवितेचे वैशिष्टय़. अलीकडच्या ‘विरक्त फुलपाखरे’ या संग्रहातील त्यांच्या या काही ओळी पाहा : ‘कोण मी? कुठून मी? कशास मी बरे इथे?/ तर्कशुद्ध मूर्खताच कार्यकारणामध्ये/ वर्तमान शून्य, त्यात शिल्प कोरणे कसे?/ आपलेच वाद्य वाजवून कोणी जातसे..’ अशाप्रकारे कवितेतून सुरू असणारा बालम केतकर यांचा ‘स्व’चा आणि भवतालाचा शोध कायम होता. तो घेताना त्यांची कविता कधी- ‘शब्दांच्या श्लेषामधले, ते क्लेष कसे सांगावे/ जे सत्य नाहिसे होते, ते सत्य कसे मानावे’ असे म्हणत तत्त्ववाहीदेखील होत असे. किंवा- ‘वर्ष वर्ष ओळखून ही तपे अनोळखी/ आपल्याच माणसात पाहुणा, अधोमुखी/ असभ्य संधिकाल हा नि त्यास मृत्यूचा लळा/ चिवचिवाट थांबला नि एक नाही कावळा’ अशा शब्दांत ती मृत्यूविषयक चिंतनही करत असे. असे ‘स्व’ला साद घालत कवितेशी अद्वैत साधलेले बालम केतकर शारीररूपाने नसले, तरी त्यांच्या कवितांतून भेटत राहतीलच!