साठ-सत्तरचे दशक हा भारतीय साहित्यातील द्वंद्वाचा काळ. एकीकडे आदर्शवादाला केंद्रस्थानी ठेवून लिहिणारी आधीची पिढी, तर दुसरीकडे प्रयोगशील, युरोपीय आधुनिकतेची आणि भारतीय परंपरांचीही तितकीच जाण असणारी साठोत्तरी काळात लिहिती झालेली पिढी. असे हे द्वंद्व. सीतांशु यशश्चंद्र मेहता हे यातील दुसऱ्या- साठोत्तरी पिढीतील प्रयोगशील कवी. युरोपीय साहित्यविचाराची कास धरणारे तरी भारतीय मिथकांची पुनर्रचना करून त्यांचे समकालीनत्वाशी नाते जोडू पाहणारे सर्जक. त्यांना बिर्ला फाऊंडेशनकडून दिला जाणारा ‘सरस्वती सन्मान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

कच्छमध्ये (१९४१) जन्मले, पण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून गुजराती आणि संस्कृत विषयात पदवी, तर मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर व पुढे पीएच.डी.पर्यंत शिक्षण त्यांनी घेतले. काही काळ त्यांनी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयात अध्यापनही केले. दरम्यान, फुलब्राइट शिष्यवृत्तीतून त्यांनी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सौंदर्यशास्त्र व तौलनिक साहित्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसेच फोर्ड वेस्ट युरोपीय शिष्यवृत्तीतून फ्रान्समध्ये वर्षभर त्यांनी फ्रेंच नाटककार यूजीन आयनेस्कोलिखित शेक्सपिअरच्या नाटकावरील ‘मॅक्बेट’ हे उपहासनाटय़ आणि शेक्सपिअरकृत ‘मॅक्बेथ’ यांचा तौलनिक अभ्यासही केला; पुढे काही वर्षांनी त्यांनी आयनेस्कोच्याच ‘द लेसन’ या नाटकाचा केलेला गुजराती अनुवाद विशेष चर्चिला गेला. एकीकडे ही ‘अ‍ॅकॅडेमिक’  कारकीर्द समृद्ध होत असतानाच यशश्चंद्र यांनी सर्जनशील लेखनही तितक्याच ताकदीने याच काळात सुरू केले. ‘मोहेंजोदारो’ या संग्रहातील त्यांच्या कविता १९७० सालीच नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. पुढे चार वर्षांनी त्यांचा ‘ओदिसियास नु हालेसू’ हा कवितासंग्रह व पुढे ‘जटायू’, ‘अश्वत्थामा’, ‘वखर’ हे संग्रह प्रसिद्ध झाले. ‘जटायू’वर १९८७ साली साहित्य अकादमीची मोहोर उमटली; तर ‘वखर’ला सरस्वती सन्मान मिळणार आहे. कवितांबरोबरच त्यांचे नाटय़लेखनही गुजराती साहित्यात महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. ‘केम माकनजी क्या चाल्या’, ‘आ माणस मद्रासी लागे छे’ आणि पीटर शेफर्सच्या ‘एकूस’ (१९७३) या गाजलेल्या नाटकावर आधारलेले ‘ठोकर’, थॉमस हार्डीच्या एका कथेवर आधारित ‘वैशाखी कोयल’ आदी त्यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी समृद्ध झाली आहे. मोजकेच पण सघन समीक्षालेखन, तसेच अनेक परदेशी भाषांतील साहित्याचे गुजराती अनुवादही त्यांनी केले आहेत. साहित्य अकादमीच्या ‘एनसायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर’चे ते एक संपादक आहेत.

बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्राध्यापक व नंतर सौराष्ट्र विद्यापीठात कुलपती राहिलेले यशश्चंद्र त्यांच्या अभ्यासू, पण सौम्य स्वभावामुळे केवळ गुजरातच्याच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील साहित्यसंस्थांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.