पोलंडमधील साहित्य वर्तुळात मोठा दबदबा असलेल्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांच्या ‘फ्लाइट्स’ या कादंबरीला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार अलीकडेच मिळाला. हा पुरस्कार मॅन बुकर पुरस्काराचेच भावंड असून तो इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो. ‘फ्लाइट्स’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर हे जेनिफर क्रॉफ्ट यांनी केले असून या पुरस्काराची ५०हजार पौंडाची रक्कम दोघींना समान वाटली जाणार आहे. ओल्गा यांची ओळख ही केवळ लेखक एवढीच नाही तर त्या कार्यकर्त्यां व विचारवंतही आहेत. समीक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे तसेच त्यांना लेखिका म्हणून मोठे व्यावसायिक यशही मिळाले आहे. सहसा समीक्षकांनी गौरवलेले लेखक हे व्यावसायिक यश मिळवतातच असे नाही पण ओल्गा या त्याला अपवाद आहेत.

त्यांनी वॉर्सा विद्यापीठातून मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या कादंबऱ्या, कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘फ्लाइटस’ या कादंबरीला यापूर्वी पोलंडचा सर्वोच्च नाइके साहित्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जर्मन पोलिश इंटरनॅशनल ब्रिज पुरस्कारही त्यांना लाभला. ओल्गा यांचा जन्म पोलंडमधील सुलेशोचा. मानसशास्त्र शिकत असताना त्यांनी प्रौढांच्या आधार केंद्रात जाऊन त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला होता. त्यांनी काही काळ समुपदेशनाचे काम केले. थोर मानसशास्त्रज्ञ  कार्ल गुस्ताफ युंग यांच्या विवेचनातून त्यांना साहित्य लेखनाची प्रेरणा मिळाली.

ओल्गा या नोवा रूडा या छोटय़ा गावात राहतात. त्यांची रूटा नावाची खासगी प्रकाशन कंपनी आहे. त्या ‘द ग्रीन्स’ या पर्यावरणवादी राजकीय पक्षाच्या सदस्य असून डाव्या विचाराच्या आहेत. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलिश लेखिका. शंभर कादंबऱ्यातून त्यांच्या पुस्तकाची निवड झाली. पोलंडने तेथील वाईट कालखंडाचे विवेचन करण्याचे  धारिष्टय़ दाखवावे असे त्यांचे म्हणणे आहे.

‘फ्लाइटस’मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धत वापरलेली नाही. त्यांच्या लेखनात भावनांचा वेगळा पोत दिसतो. त्यांची पात्रेही वेगळी आहेत. आजच्या जगात मानव जात ही भटक्यासारखी जगते, सतत काहीतरी मिळवून पुढे चालण्याची ही वृत्ती. मानवी  शरीराची मर्त्यता त्यांना खुणावते. त्यांच्या ‘ड्राइव्ह युवर प्लाव ओव्हर द बोन्स ऑफ दी डेड ’या कादंबरीचे भाषांतर सप्टेंबर २०१८ मध्ये येणार आहे. ज्या पुस्तकाला पोलंडचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला ते १ लाख ७० हजार खपाचे ‘द  बुक्स ऑफ जेकब’ हे पुस्तक २०१९ मध्ये इंग्रजीत येत आहे.

पोलंडमधील प्रचलित उजव्या राजकारणाच्या टीकाकार म्हणून दुसरीकडे त्या बदनामही आहेत. त्यांच्या मतांनी देशात खळबळ उडवली आहे. त्यांच्या ‘ड्राइव्ह युअर प्लाव ओव्हर द बोन्स ऑफ द डेड ’ या पुस्तकाचे चित्रपट रू पांतर वादग्रस्त ठरले.  ते ख्रिस्ती धर्मविरोधी आहे अशी टीका पोलिश उजव्यांनी केली. ‘इतिहासात पोलंडने वसाहतीकरणाच्या नावाखाली अनेक पापे केली आहेत’ असे त्यांनी २०१४ मध्ये जाहीर मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे त्यांना अंगरक्षक देण्याची वेळ आली. जगभरात देशी राष्ट्रवादाची नवी कट्टर रूपे पुढे येत असताना त्यांचे लेखन हे विचार तेवता ठेवणारे आहे. बंडखोर विचारांची लेखिका म्हणून त्यांचे वेगळेपण उठून दिसणारे आहे.