आसामच्या ‘सत्तरिया’ नृत्याचे वर्णन एकाच शब्दात करायचे तर, हे नृत्य ‘रेशमासारखे’ असते. नर्तकाचे धोतर, उपरणे किंवा नर्तिकेची सकच्छ साडी आदी कपडे आसामी रेशमाचे असतातच; पण या नर्तकांच्या हातांच्या हालचालीही जणू रेशमाच्या ताग्यावरून हात फिरल्यासारख्या मुलायम. नर्तकांचे पदन्यास मृदुंगाच्या तालाला, पण हस्तलालित्य मात्र बासरीच्या रेशमी सुरांनाच प्रतिसाद देणारे! या सुरांचे रेशीम आपल्या बासरीतून जपणारे ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ विजेते वादक-संगीतकार प्रभात शर्मा यांचे मंगळवारी रात्री गुवाहाटीतल्या राहात्या घरी, झोपेतच निधन झाले तेव्हा एका संगीतपरंपरेचे गर्भरेशमी वस्त्र जरासे विरल्याचा भास चाहत्यांना झाला असेल.

प्रभात शर्मा हे १९३५ साली आसामच्या बारपेटा जिल्ह्यात जन्मले. त्यांचे घराणे मध्ययुगीन वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचे अनुयायी. शंकरदेवांनी रचलेला बोरगीत हा (तालापेक्षा लयीलामहत्त्व देणारा) गानप्रकार प्रभात शर्मा बालपणापासून शिकले. गंगाधरदेव मिश्र, सत्यकृष्णदेव मिश्र, नरहरी बुढाभगत या आसामी वैष्णव-संगीत परंपरेतील गुरूंकडे शिकल्यानंतर बासरीचे धडे घेण्यासाठी ते गौर गोस्वामी यांच्याकडे गेले. परंपरागत ज्ञानाला शिक्षणातून आलेल्या चौकसपणाचीही जोड दिल्यामुळे त्यांना ‘आसाम माहिती केंद्रा’त नोकरी मिळाली, परंतु संगीताच्या प्रेमापायी ही नोकरी सोडून ‘आकाशवाणी’तील संधी त्यांनी स्वीकारली. इथे बोरगीत-परंपरेचे जाणकार आणि उत्तम बासरीवादक ही त्यांची वैशिष्टय़े खुललीच, पण संगीतकार म्हणून काम करण्याचाही भरपूर अनुभव मिळाला. अनेक आसामी कवींच्या कविता प्रभात शर्माच्या संगीत-दिग्दर्शनातून भावगीत, भक्तिगीत, चिंतनगीत म्हणून लोकांपर्यंत पोहोचल्या. निवृत्तीनंतर काही आसामी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले, तसेच उतारवयातही आसामी चित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध केली.

मात्र या लौकिक यशाने प्रभात शर्मा समाधानी नव्हते. त्यांनी उत्तमोत्तम शिष्य निर्माण केले, तसेच घरच्या घरीच आसामातील जुन्या आणि ‘हल्ली कोण वाजवते?’ म्हणून बाजूला पडलेल्या अनेक वाद्यांचा संग्रह केला. यातून एक संग्रहालय उभे राहावे, यासाठी संस्था-उभारणीची प्रक्रियाही त्यांनी सुरू केली. शंकरदेवांच्या रचनांचा रेशीमस्पर्श लाभलेल्या ‘सत्तरीय नृत्या’विषयी त्यांनी कोणाच्याही मदतीविना संशोधन सुरू ठेवले. आसामचे पारंपरिक संगीत जपल्याबद्दल, २००३ मध्ये त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला, त्याआधी व नंतरही अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.