देशातील अनेक भाषा वेगवेगळ्या कारणांनी अस्तंगत होत असताना तसेच भाषिक संघर्षांतून मार्ग काढताना भाषाशास्त्रज्ञांचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवते. आसामचे विद्वान भाषाशास्त्रज्ञ प्रमोदचंद्र भट्टाचार्य यांनी चिनी-तिबेटी भाषांचा सखोल अभ्यास करून न थांबता, या भाषांचा देशातील इंडो-आर्यन भाषा व पूर्व/ ईशान्य भारतातील भाषांवर झालेला परिणाम तपासून पाहिला. आसामच्या बोडो भाषेचे संशोधन त्यांनी सर्वप्रथम केले. त्यासाठीच त्यांना १९६५ मध्ये गुवाहाटी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. यातून बोडो भाषेचा आठव्या परिशिष्टात समावेश झाला. ‘बोडो फोक साँग अ‍ॅण्ड टेल्स’ (१९५७) व ‘धिस इज आसाम’ (१९५८ -सहलेखक बी. एन. शास्त्री) ही त्यांची पुस्तके विशेष गाजली.

आसामी भाषेतही त्यांनी विपुल लेखन केले. भाषा व भाषाशास्त्रातील विषयांवर त्यांनी वीस पुस्तिका लिहिल्या. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया’ व शिलाँगच्या ‘नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल इंडिया कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रीसर्च’ या संस्थेचे ते सदस्य होते. भट्टाचार्य यांनी बरीच भटकंतीही केली होती. त्यातूनच त्यांनी वेगवेगळ्या आदिवासी भाषांचा अभ्यास करतानाच ‘नॉर्थ ईस्टर्न लँग्वेज सोसायटी’ची स्थापना १९८० मध्ये केली. १९८१ मध्ये त्यांनी ‘लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ आसाम’ ही आणखी एक संस्था स्थापन केली. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ नॉर्थ ईस्टर्न लँग्वेजेस’ या संस्थेचे ते संचालक होते. भाषा विषयक अनेक परिषदांना त्यांनी परदेशांतही हजेरी लावली, ईशान्येकडील राज्ये ही भाषाशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञांची भूमी आहे हे त्यांच्यामुळे जगाला कळले.

या भागातील लोकसंस्कृतीच्या दस्तावेजीकरणाचे मोठे कामही त्यांनी केले, अन्यथा हा लोकसंस्कृतीचा वारसा काळाच्या ओघात नष्ट झाला असता. त्यांच्या अभ्यासातूनच बोडो भाषेला शिक्षणक्रमात स्थान मिळाले व आता पदवीसाठी त्या भाषेचा आधुनिक भारतीय भाषा म्हणून समावेश झाला आहे. ते लोकसाहित्यकार व शिक्षणतज्ज्ञही होते. बी बरुआ कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले होते. त्याआधी ते आसामी भाषा शिकवीत होते.  आसाम साहित्य सभेने त्यांना ‘साहित्याचार्य’ सन्मान  देऊन गौरवले. डॉ. लीला गोगोई पुरस्कार, डॉ. कृष्णा कांत हांडिक पुरस्कार, उपेंद्रनाथ ब्रह्मा पुरस्कार, कालिचरण शर्मा पुरस्कार असे अनेक मान-सन्मान त्यांना लाभले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

((समाप्त))