24 October 2020

News Flash

प्रांजली पाटील

लहानपणापासून दृष्टिहीनत्वावर मात करत प्रांजलीने यशाचा एक एक टप्पा गाठला आहे

प्रांजली पाटील

दरवर्षी लाखो मुले प्रशासकीय सेवेतील कामाचे स्वप्न पाहून परीक्षा देतात. मात्र अवघ्या ८०० ते हजार विद्यार्थ्यांना ध्येय गाठता येते. अनेक शिकवण्या, वर्ग, रट्टे मारण्यासाठी पुस्तकांचे गठ्ठे, अभ्यासिका असा जामानिमा असतानाही वेगळी वाट निवडण्याची वेळ अनेकांवर येते. माहिती, ज्ञान, विचारशक्ती, निर्णयक्षमता अशा अनेक कौशल्यांचा कस लागणाऱ्या केंद्रीय लोकसेवा परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रांजली पाटील हिने बाजी मारली. लहानपणापासून दृष्टिहीनत्वावर मात करत प्रांजलीने यशाचा एक एक टप्पा गाठला आहे. समाज, व्यवस्था, परिस्थितीशी संघर्ष करत ध्येय गाठणाऱ्या  प्रांजलीने प्रशिक्षण पूर्ण करून आता तिरुअनंतपुरमच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

ती मूळची भुसावळ तालुक्यातील. गेली अनेक वर्षे उल्हासनगर येथे मुक्कामी. लहानपणी खेळत असताना डोळ्याला इजा झाली आणि त्यानंतर जवळपास सहाव्या वर्षांपासून एका डोळ्याची दृष्टी गेली. नंतर एका आजारपणात दुसऱ्याही डोळ्याने दिसेनासे झाले. मात्र मुळात लढाऊ वृत्ती आणि चिकाटी यांमुळे, परिस्थितीला शरण न जाता तिचा संघर्ष सुरू झाला. दादर येथील कमला मेहता अंधशाळेतून दहावीपर्यंतचे आणि नंतर चांदिबाई महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीला तिला ८५ टक्के गुण मिळाले होते. कला शाखेत राज्यशास्त्रातील पदवी सेंट झेविअर्स महाविद्यालयातून घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने दिल्लीचे ‘जेएनयू’ गाठले. तेथे शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचे तिने निश्चित केले. परीक्षेची तयारीही सुरू केली. दरम्यान पीएच.डी.चीही तयारी सुरूहोती. ब्रेलमध्ये परीक्षेचे साहित्य उपलब्ध होण्यापासून ते विश्वासू लेखनिक मिळण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर संघर्ष होता. त्यातूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०१६ मध्ये तिचा ७७३ वा गुणानुक्रमांक आला आणि रेल्वे सेवेत निवडही झाली. मात्र, ती शंभर टक्के अंध असल्यामुळे रेल्वे विभागाने तिला नियुक्ती देण्यास नकार दिला. तिने याविरोधात आवाज उठवला. पंतप्रधान कार्यालय, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मेल केला. तिच्या प्रयत्नांना यश आले आणि कार्मिक मंत्रालयाने या घटनेची दखल घेतली. तिला फरिदाबाद येथे पोस्ट आणि दूरसंपर्क विभागात नियुक्ती देण्यात आली. प्रांजलीने पुढील वर्षी (२०१७) पुन्हा परीक्षा देऊन १२४ वा गुणानुक्रमांक पटकावला आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) तिची निवड झाली. मुंबईतील लोकलच्या प्रवासापासून ते आयोगाच्या मुलाखतीपर्यंत सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडच्या अनेक अडचणींना तोंड देताना ‘हार मानायची नाही, प्रयत्न सोडायचे नाहीत,’ या नसानसात भिनलेल्या तत्त्वाने यशाचा मार्ग दाखवल्याचे प्रांजली आवर्जून सांगते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2019 1:10 am

Web Title: pranjal patil first visually challenged woman ias officer zws 70
Next Stories
1 कद्री गोपालनाथ
2 राम मोहन
3 बी. एन. युगंधर
Just Now!
X